Sat Jun 10 2023
समोसा खायला कोणाला आवडत नाही? सर्वांनाच आवडतो. हे खरे आहे, पण त्या बरोबर आपण हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे की जो समोसा आपण नेहमी खातो तो कॅलरींनी ठासून भरलेला असतो. त्या मध्ये पौष्टिकता नावालाही नसते. असे जरी असले तरी काळजी करू नका, ह्याला पर्याय नक्कीच आहे. अतिशय कमी कॅलरींनी युक्त आणि पौष्टिक समोसा बनवणे व त्याचा आस्वाद घेणे नक्कीच शक्य आहे. खाली दिलेली (व्हिडिओ आणि लिखित स्वरूपात) 'कमी कॅलरी युक्त मिक्स - भाज्यांचे समोसे बनवण्याची रेसिपी ह्या करता तुम्हाला नक्की मार्गदर्शन करेल. अश्या प्रकारे बनवलेला समोसा तुम्हाला योग्य पोषण तेही कमी कॅलरीं मध्ये आणि चव व स्वाद ह्यांच्याशी कुठलीही तडजोड न करता देऊ शकेल.
मिक्स भाज्यांचे (लो कॅलरी) समोसे
साहित्य (१२ समोसे बनवण्यासाठी पुरेसे)
• मुख्यसाहित्य: १. गाजर - १ (मध्यम आकाराचे ) २. फ्लॉवर (फुलकोबी ) - २-३ छोटे तुकडे ३. दुधीभोपळा - १०० ग्रॅम ४. लालभोपळा - १५० ग्रॅम ५. कोबी - १०० ग्रॅम ६. बटाटे - २ (मध्यम आकाराचे) ७. राईस पेपर - ६ (जनरल स्टोअर्स मध्ये उपलब्ध )
• फोडणीसाठी : १. मोहरी - १/४ टी स्पून २. हळद (पूड ) - १/४ टेबल स्पून
• मसाले : १. संडे मसाला : १ टेबल स्पून २. आलं - लसूण - मिरची - कोथिंबीर पेस्ट - १ टेबल स्पून ३. धना - जीरा पावडर - १ टेबल स्पून ४. चाट मसाला - १/२ टेबल स्पून ५. मीठ - चवी प्रमाणे ६. तेल - फक्त ब्रशिंग साठी ७. लिंबाचा रस - पर्यायी
१. सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.
२. त्या नंतर गाजर, दुधी आणि लालभोपळ्याची सालं काढून घ्यावीत.
३. बटाटे उकडून घ्यावेत आणि मग त्याची साल काढावी.
४. बटाटे सोडून इतर सर्व भाज्या व्यवस्थित किसून घ्याव्यात आणि एकमेकात नीट मिक्स करून घ्याव्यात.
५. त्या नंतर किसलेल्या आणि मिक्स केलेल्या सर्व भाज्या २० मिनिटांसाठी कोमट पाण्या मध्ये भिजत ठेवाव्यात.
६. २० मिनिटां नंतर कोमट पाणी गाळून काढून टाकावे व ह्या किसलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात.
७. आता भाज्यां मधील सर्व पाणी नीट गाळून घ्यावे व त्या शक्य तितक्या कोरड्या कराव्यात.
८. उकडलेले बटाटे सोडून इतर सर्व भाज्या एका कढई मध्ये घेऊन नीट वाफवून घ्याव्यात. या करता गॅस शेगडीचा, स्टोव्हचा किंवा इंडक्शनप्लेट ( हॉटप्लेट ) चा वापर करू शकता.
९. आता दुसरी कढई घेऊन गॅस शेगडीवर/ स्टोव्ह / हॉटप्लेट वर ठेवावी. कढईला ब्रशने जास्तीत २-३ थेंब तेल लावून घ्यावे, व कढई मध्ये मोहरी आणि हळद (पूड) घालावी.
१०. मोहरी तडतडायला लागल्यावर कढई मध्ये वाफवलेल्या भाज्या घालाव्यात व त्या मध्ये उकडलेले बटाटे स्मॅश करून मिक्स करावेत.
११. नंतर कढईतील मिश्रणात साहित्यात दिल्या प्रमाणे सर्व मसाले (संडे मसाला, चाट मसाला, धने-जिरेपूड, आलं - लसूण - मिरची - कोथिंबीर पेस्ट आणि चवी प्रमाणे मीठ) मिक्स करावेत.
१२. त्या नंतर सर्व पदार्थ एकमेकांत मिसळून एकजीव होई पर्यंत कढई मध्ये परतून घ्यावे.
१३. आता कढईवर झाकण ठेवावे आणि कढईतील मिश्रण ५ मिनिटांपर्यंत नीट शिजू द्यावे.
१४. मिश्रण नीट शिजल्यावर गॅस शेगडी / स्टोव्ह/ हॉटप्लेट वरून कढईसकट काढून बाजूला ठेवावे व नीट थंड होऊ द्यावे.
१५. आता राईस पेपर घ्या (गोलाकार असतात). तो दोन सामान भागात कापून घ्या. १२ समोस्यां साठी ६ राईस पेपर आवश्यक.
१६. एका प्लेट मध्ये कोमट पाणी घ्यावे व त्या मध्ये अर्धा कापलेला राईस पेपर नीट भिजवून घ्यावा आणि (विडिओ मध्ये दाखवल्या प्रमाणे ) त्याचा कोन बनवावा.
१७. आता कढई मधील थंड झालेले मिश्रण अंदाजे १ चमचा (टेबल स्पून ) राईस पेपरच्या कोन मध्ये भरावे.
१८. राईस पेपरच्या कोन मध्ये मिश्रण भरून झाल्यावर त्याच्या कडा नीट दाबून बंद कराव्या जेणे करून त्रिकोणी आकाराचा समोसा तयार होईल. अश्या प्रकारे ह्याच पद्धती मध्ये इतर समोसे बनवून घ्यावेत.
१९. आता कच्च समोसा तयार झाला. हा तुम्ही असाच सुद्धा खाऊ शकता किंवा,
किंवा,
२०. हे तयार झालेले समोसे गरम गरम व लवकरात लवकर खाणे योग्य अन्यथा पातळ राईस पेपर मऊ पडून ते खाण्याची मजा कमी होऊ शकते.
राईस पेपर उपलब्ध नसल्यास काळजी करू नये. त्या ऐवजी ज्वारीच्या पातळ भाकऱ्यांचा उपयोग करून खाली दिल्या प्रमाणे समोसा बनवावेत.
साहित्य :२१. आता हे लो कॅलरी मिक्स भाज्यांचे चविष्ट समोसे घरी बनवलेल्या टोमॅटो सॉस किंवा चटणी सोबत खाण्याची मजा लुटुयात.