Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

  

मोठा आवाज हा फक्त त्रासदायक गोष्ट नाही - तर आपल्या जीवनात हळूहळू शिरणारा एक धोकादायक घटक आहे. आपण दररोज ऐकतो त्या गाड्यांचे हॉर्न, मशीनचा गोंगाट हे आपल्या शरीरावर आणि मनावर गंभीर परिणाम करू शकतात. ध्वनी प्रदूषणाचे आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेणे केवळ महत्त्वाचेच नाही, तर अतिशय आवश्यक आहे. चला तर मग, या अदृश्य धोक्याची सखोल माहिती घेऊया आणि आपल्याला वाटते त्यापेक्षा जास्त धोकादायक का आहे त्याबद्दल समजून घेऊ. 

 

ध्वनी प्रदूषण आपल्या आरोग्यावर कसे परिणाम करते? 

शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम:

  • श्रवणशक्ती कमी होणे: सतत मोठ्या आवाजात राहिल्यास केवळ कान दुखत नाहीत, तर ऐकण्याची क्षमता कायमस्वरूपी कमी होऊ शकते. याला (नॉइज-इन्ड्युस्ड हिअरिंग लॉस - मोठ्या आवाजामुळे श्रवणशक्ती कमी होणे ) म्हणतात.

  • हृदयाशी संबंधित समस्या: मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कामुळे शरीरात तणाव निर्माण करणाऱ्या हार्मोन्सची पातळी वाढते, ज्यामुळे रक्तदाब वाढणे, हृदयविकार अशा समस्या निर्माण होऊ शकतात.

  • झोपेचे विकार: झोप आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची असते, पण ध्वनी प्रदूषण आपल्या झोपेच्या चक्रात व्यत्यय आणू शकते. त्यामुळे निद्रानाश, थकवाआणि झोपेची गुणवत्ता कमी होणे असे त्रास होतात, जे आपल्या दैनंदिन जीवनावर परिणाम करु शकतात.

  • चयापचयासंबंधी समस्या: मोठ्या आवाजाच्या संपर्कात सतत राहिल्यास आपल्या शरीरातील चयापचय क्रिया बिघडू शकते. काही वैद्यकीय अभ्यासांनुसार, ध्वनी प्रदूषण आणि टाइप २ मधुमेह यामध्ये संबंध आढळून आला आहे.

  • इतर शारीरिक त्रास: मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे होणारे आरोग्याचे परिणाम फक्त आपल्या कानांपुरते किंवा हृदयापुरते मर्यादित राहत नाहीत – त्यामुळे डोकेदुखी, श्वास घेण्यास अडचण, सतत थकवा वाटणे असे त्रास होऊ शकतात आणि स्ट्रोकचा (अर्धांगवायूचा) धोका देखील वाढू शकतो. ध्वनी प्रदूषणाचा शारीरिक आरोग्यावर मोठा आणि चिंताजनक परिणाम होतो, जो हळूहळू मोठ्या समस्येचे रूप घेऊ शकतो.

मानसिक आरोग्यावर परिणाम :

  • तणाव आणि चिंता: सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे शरीरात तणावाची (लढा किंवा पळा) अशी नैसर्गिक प्रतिक्रिया सुरू होते. ही प्रतिक्रिया जर सतत होत राहिली, तर चिंता, चिडचिडेपणा, आणि दैनंदिन कामात लक्ष केंद्रित करण्यास अडथळा येऊ शकतो.

  • विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम: मोठ्या आवाजाच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे मेंदू झाकोळला जातो (प्रौढ आणि मुले दोघांसाठीही), ज्यामुळे स्मरणशक्ती,  लक्ष केंद्रीत करणे, आणि शिकण्याची क्षमता अशा गोष्टींवर परिणाम होतो (विशेषत: लहान मुलांमध्ये) शिकण्याची क्षमता कमी होऊ शकते.

  • मानसिक आरोग्य स्थिती: ध्वनी प्रदूषणाच्या दीर्घकाळ संपर्कात राहिल्याने नैराश्य आणि चिंता यासारखे मानसिक आरोग्य विकार होण्याचा किंवा पूर्वीपासून असलेल्या आजारांमध्ये बिघाड होण्याची शक्यता वाढते.

  • चिडचिड आणि अस्वस्थता: आवाज जरी फार मोठा नसला तरीही, जर तो सतत ऐकायला लागला तर त्यामुळे चिडचिड आणि अस्वस्थता निर्माण होते. याचा आपल्या एकूण मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो.

 

लोकसंख्येतील विशिष्ट गटांना असणारा धोका?

  • मुले: लहान मुलांचे कान आणि विकसनशील मेंदू आवाजाला जास्त संवेदनशील असतात. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाचा त्यांच्यावर अधिक वाईट परिणाम होतो, ज्यामुळे त्यांना शिकण्यामध्ये अडथळे येऊ शकतात आणि विकासात समस्या निर्माण होऊ शकतात.

  • पूर्वीपासूनच पूर्वीपासून काही आजार असलेले लोक: ज्यांना हृदयविकार, ऐकण्याची समस्या किंवा मानसिक आरोग्याच्या समस्या आधीपासूनच आहेत, अशा लोकांना दीर्घकाळ ध्वनी प्रदूषणाच्या संपर्कात आल्यास अधिक मोठा धोका असतो.

  • गोंगाटात काम करणारे लोक: बांधकाम स्थळे, कारखाने, विमानतळ यांसारख्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांना दररोज जास्त आवाजाला सामोरे जावे लागते, ज्यामुळे त्यांना ऐकण्याची क्षमता कमी होणे आणि इतर दीर्घकालीन आरोग्य समस्या समस्यांचा धोका वाढतो.

ध्वनी प्रदूषण ही एक गंभीर आरोग्य समस्या बनत आहे, जी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करत आहे. हे आपल्या कानांपासून ते हृदयापर्यंत, झोपेपासून ते तणावापर्यंत—आपल्या जीवनाच्या जवळपास प्रत्येक पैलूला स्पर्श करते. ह्याचे धोके ओळखणे हे तर केवळ पहिले पाऊल आहे! खरी जबाबदारी तर सर्वांसाठी शांततापूर्ण आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्याची आहे. चला तर मग, पुढे आपण पाहूया की यापासून आपण स्वतःचे संरक्षण कसे करू शकतो आणि आपल्या जीवनावर होणारे याचे परिणाम कसे कमी करू शकतो.

 

ध्वनी प्रदूषणापासून स्वतःला कसे वाचवायचे?

आजच्या धावपळीच्या जीवनात शांतता ही एक प्रकारची चैन बनली आहे. त्यामुळे आपल्या कानांची आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ध्वनी प्रदूषणापासून संरक्षण करणे आता खूपच गरजेचे झाले आहे. खाली दिलेले सोपे उपाय वापरून आपण या हानिकारक आवाजांपासून स्वतःचा बचाव करू शकतो: 

मोठ्या आवाजाच्या संपर्कात कमीतकमी रहा :

  • मोठ्या आवाजाच्या ठिकाणांपासून दूर राहा: बांधकाम स्थळं, गर्दीचे रस्ते, आणि तीव्र आवाज असलेली मनोरंजनस्थळं – या सारख्या ठिकाणांपासून शक्य तितकं दूर राहा.

  • आवाजापासून वेळोवेळी विश्रांती घ्या: जर गोंगाटाच्या वातावरणात राहणे अपरिहार्य असेल, तर वेळोवेळी शांत ठिकाणी थोडा वेळ घालवा. अशा विश्रांतीमुळे आपल्या कानांना थोडा वेळ आराम मिळतो आणि त्यांच्यावरचा एकूण ताण कमी होतो. 

  • आपण निर्माण करत असलेल्या आवाजाबद्दल सजग रहा: घरी, ऑफिसमध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी बोलताना, संगीत ऐकताना किंवा उपकरणे वापरताना आवाजाकडे लक्ष द्या. यामुळे एकूणच आवाज कमी होण्यास मदत होते. 

 

 

ऐकण्यासाठी संरक्षणात्मक उपायांचा वापर करा :

  • इअरप्लग्स (कानात घालायचे स्टॉपर): मोठ्या आवाजाच्या ठिकाणी इअरप्लग घालणे हा कानांचं संरक्षण करण्याचा एक सोपा पण प्रभावी मार्ग आहे. हे ऐकण्याची क्षमता दीर्घकाळ सुरक्षित ठेवण्यास मदत करतात.

  • आवाज कमी करणारे हेडफोन (नोइज-कॅन्सलिंग हेडफोन): हे हेडफोन्स बाहेरील आवाज रोखण्यास मदत करतात, ज्यामुळे कमी आवाजात ऑडिओचा आनंद घेता येतो आणि दररोजच्या आवाजामुळे कानांना येणारा थकवा कमी होतो.

  • इअरमफ्स (कान झाकणारे कव्हर्स): हे कान पूर्णपणे झाकतात आणि जोराच्या आवाजापासून चांगले संरक्षण देतात. हे दीर्घ वेळ वापरण्यास सोपे असतात आणि बांधकाम स्थळे, कारखाने अशा ठिकाणी यांचा चांगला उपयोग होतो.

 

ध्वनीरोधक घर व कार्यालय  :

  • इन्सुलेशन: तुमचं घर किंवा ऑफिस नीट इन्सुलेटेड असल्याची खात्री करा. घर किंवा ऑफिसमध्ये योग्य इन्सुलेशन (भिंती आणि छतांमध्ये) केल्यास बाहेरचा आवाज आत येत नाही.

  • ध्वनिरोधक खिडक्या आणि दरवाजे: आवाज कमी करण्यासाठी अद्ययावत खिडक्या आणि दरवाजे बसवून घ्यावेत. यामुळे बाहेरुन खोलीत येणारा बाहेरील आवाज खूप कमी होतो.

  • शोभेचा विभाग: पडदे, गालिचे आणि इतर मऊ वस्तू आवाज शोषून घेतात. त्यामुळे तुमचं घर किंवा ऑफिस अधिक शांत आणि आरामदायक वाटतं.

 

ध्वनी प्रदूषण कसे रोखावे?

ध्वनी प्रदुषणापासून जरी स्वतःचे संरक्षण करणे महत्त्वाचे असले तरी, ध्वनी प्रदूषणाला त्याच्या मूळ स्रोतावरच रोखणे अधिक परिणामकारक ठरते. दररोजच्या लहान-सहान सवयींपासून ते संपूर्ण समाजासाठीच्या प्रयत्नांपर्यंत — प्रत्येकजण आपल्या सभोवतालचा आवाज कमी करण्यात भूमिका बजावू शकतो. आपण केवळ जागरूक न राहता, सक्रियपणे या समस्येच्या निराकरणासाठी पुढाकार घेऊया. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी काही सोपे उपाय आहेत:

 

व्यक्तिगत पातळीवरील कृती :

  • वैयक्तिक पातळीवर आवाज कमी करावा:
    1. संगीत, टीव्ही किंवा इतर उपकरणांचा आवाज कमी ठेवावा किंवा हेडफोन वापरावेत.
    2. शांत वेळेत (विशेषतः रात्री) मोठ्याने बोलणे  किंवा गोंगाट करणं टाळावे.
    3. घरी आणि वैयक्तिक वापरासाठी कमी आवाज करणारी आणि ऊर्जा बचत करणारी उपकरणे निवडावीत.
    4. मोठ्या आवाजाच्या क्षेत्रात काम करताना नेहमी इअरप्लगस्‍ किंवा इअरमफ्स वापरावेत.
    5. शक्य असल्यास चालावे किंवा सार्वजनिक वाहतूकीचा वापर करावा. हे पर्याय रहदारीच्या आवाजाचा पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यास मदत करतात.
    6. आपली गाडी, दुचाकी किंवा अन्य मशीन्सची वेळोवेळी चांगल्या प्रकारे देखभालीची खात्री करावी. आवाज करणारे इंजिन बहुतेकदा इंजिनची खराब कामगिरी दर्शवते - आणि एकूण ध्वनी प्रदूषणात भर घालते.

  • शांतता राखणाऱ्या पायाभूत सुविधांना पाठिंबा द्या:
    1. हिरवळ वाढवण्यास प्रोत्साहन द्यावे: झाडे, झुडुपे आणि ग्रीन बेल्ट्स (हिरवळीचे पट्टे) नैसर्गिकरित्या आवाज शोषून घेतात. परिसरात बागा तयार करणे आणि झाडे लावणे यामुळे वातावरण शांत आणि सुखद होते.
    2. शांत रस्ते आणि इमारतींची मागणी धरावी: रस्ते, घरे आणि सार्वजनिक इमारती उभारताना आवाज कमी करणारे साहित्य व तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करावे.
    3. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला पाठिंबा द्यावा: शांत आणि कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीचा विनियोग करावा. यामुळे खाजगी वाहनांवर अवलंबन कमी होते आणि त्यांच्यामुळे होणारा आवाजही कमी होतो.

  • ध्वनी नियंत्रणासंबंधी धोरणांना समर्थन द्या:
    1. ध्वनी नियंत्रण नियमांना पाठिंबा द्यावा: विशिष्ट भागांमध्ये आवाजावर मर्यादा ठेवणाऱ्या नियम व कायदे लागू करण्यास पाठिंबा द्यावा.
    2. सामुदायिक चर्चांमध्ये सहभागी व्हावे: स्थानिक बैठका आणि उपक्रमांमध्ये भाग घ्या जिथे ध्वनी प्रदूषणाच्या समस्यांवर चर्चा होते. तुमचे मत आणि सहभाग व्यवहार्य आणि लोकाभिमुख उपाय तयार करण्यात मदत करू शकतात.

 

 

आवाज कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा: 

  • आवाज कमी करणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करावा:
    • आवाजाला प्रतिबंध करणारे अडथळे वापरावेत: जास्त आवाज असलेल्या ठिकाणी आवाज रोखण्यासाठी आवाजाला प्रतिबंध करणारे अडथळे किंवा ध्वनी-शोषक साहित्य बसवावे.
    • कमी आवाज करणाऱ्या यंत्रांचा वापर करावा: शक्य असेल तिथे, कमी आवाज निर्माण करणारी यंत्रे आणि उपकरणे निवडावीत.
    • Improve acoustics: इमारतींची रचना अशा पद्धतीने सुधारावी जेणेकरुन घरातील आवाजाचा त्रास कमी होईल.

 

  • ध्वनी नियंत्रण नियम काटेकोरपणे पाळावेत:
    • ध्वनी निर्बंधित विभाग (झोनिंग) नियम लागू करावा: घर, शाळा आणि रुग्णालयांपासून गोंगाट निर्माण करणारे उद्योग दूर ठेवावेत आणि यासाठी ध्वनी निर्बंधित विभागाचे नियम लागू करावेत.
    • ध्वनी नियंत्रणाचे नियम अमलात आणावेत: आवाज मर्यादा राखण्यासाठी असलेले नियम काटेकोरपणे पाळले जात आहेत याची खात्री करुन घ्यावी.


  • जागरूकता वाढवावी:
    • जनजागृती मोहिमा राबवावी: ध्वनी प्रदूषणाच्या परिणामांबद्दल लोकांना समजावून सांगण्यासाठी जनजागृती मोहिमा आयोजित कराव्यात.
    • स्थानिक संस्थांसोबत काम करावे: ध्वनीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी स्थानिक संघटनांसोबत पुढाकार घ्या आणि समस्यांचे निराकरण करावे.

 

REFERENCES:

  1. https://www.webmd.com/a-to-z-guides/what-is-noise-pollution
  2. https://education.nationalgeographic.org/resource/noise-pollution/
  3. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC9832265/
  4. https://earth5r.org/noise-pollution-in-india-a-silent-killer/
  5. https://oizom.com/knowledege-bank/prevention-of-noise-impact-through-noise-monitoring/
  6. https://interfaithsustain.com/sources-of-noise-pollution/
  7. https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC4918642/

 

  


Reader's Comments


Submit Your Comments