Wed Aug 13 2025
वायू प्रदूषण म्हणजे वातावरणातील (घराच्या आत किंवा बाहेर) हानिकारक रासायनिक, भौतिक किंवा जैविक घटकांचे उत्सर्जन होणे. या हानीकारक घटकांमुळे (प्रदूषकांमुळे) मानव व इतर सजीवांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो, तसेच हे प्रदूषण पृथ्वीवरील इतर घटक व जीवसाखळी आणि पर्यावरणासाठीही अत्यंत घातक ठरते.
वायू प्रदूषणाच्या तीव्रतेचे मोजमाप करण्यासाठी एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) म्हणजेच हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक हे साधन वापरण्यात येते. AQI हवेतील हानिकारक घटकांच्या (प्रदू्षकांच्या) प्रमाणावर आधारित हवेच्या गुणवत्तेचे वर्गीकरण करतो. भारतात खालील प्रमुख प्रदूषकांचे AQI द्वारे निरीक्षण केले जाते:
१. हवेतील सुक्ष्म कण ज्यांचा व्यास 2.5mm पेक्षा कमी आहे (पीएम् २.५)
२. हवेतील सुक्ष्म कण ज्यांचा व्यास 10mm पेक्षा कमी आहे (पीएम् १०)
३. नायट्रोजन डायऑक्साइड (NO₂)
४. सल्फर डायऑक्साइड (SO₂)
५. कार्बन मोनोऑक्साइड (CO)
६. भूतल स्तरावरील ओझोन (O₃)
७. अमोनिया (NH₃)
८. शिसे (Pb)
हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकानुसार (एक्युआय) हवेची गुणवत्ता किंवा वायू प्रदूषणाची तीव्रता सहा श्रेणींमध्ये विभागली जाते:
१. चांगले (एक्युआय - ० ते ५०) - आरोग्यावर अत्यल्प प्रमाणात परिणाम.
२. समाधानकारक (एक्युआय - ५१ ते १००) - संवेदनशील व्यक्तींमध्ये श्वास घेण्यास किरकोळ त्रास होऊ शकतो.
३. मध्यम (एक्युआय - १०१ ते २००) - श्वसनमार्गाचे आजार, हृदयरोग, मुले आणि वयस्क प्रौढांमध्ये श्वास घेण्यास त्रास जाणवू शकतो.
४. वाईट (एक्युआय - २०१ ते ३००) - दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी व्यक्तींनाही त्रास जाणवू शकतो.
५. खूप वाईट (एक्युआय - ३०१ ते ४००) - दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास निरोगी व्यक्तींमध्येही श्वसनविकार निर्माण होऊ शकतो.
६. घातक (एक्युआय - ४०१ ते ५००)- निरोगी व्यक्तींमध्ये अगदी हलक्या शारीरिक हालचालींदरम्यानही अस्वस्थता जाणवू शकते.
दिवसागणिक श्वासोच्छ्वासासाठी शुद्ध हवा मिळणे कठीण होत चालले आहे, कारण हवेतील हानिकारक घटक व त्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. वायू प्रदूषणाशी संबंधित आजार हे पर्यावरणाला घातक असेलेले सर्वात मोठे जीवघेणे संकट ठरले आहे, ज्यामुळे संपूर्ण जगभरात आतापर्यंत१७ अब्जांहून अधिक लोकांचे प्राण गेले आहेत.
हवेत असलेले हानिकारक घटक आपल्या उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत, त्यामुळे ही समस्या गंभीर स्वरुप धारण करेपर्यंत त्यांची वाढती पातळी लक्षात येत नाही. वायू प्रदूषणाचे सामान्य स्त्रोत समजून घेणे हाच ही तीव्रता कमी करण्याचा एकमेव मार्ग आहे.
१) औद्योगिक उत्सर्जन - कारखान्यांमधून सोडले जाणारे विषारी वायू जसे की सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि हवेतील दूषीत सुक्ष्मकण.
२) वाहनांमधून होणारे उत्सर्जन - वाहनांमधील इंधन (पेट्रोल/डिझेल) ज्वलनामुळे हवेत कार्बन मोनोऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि हायड्रोकार्बन इ. वायू उत्सर्जित होतात जे वायुप्रदूषणास कारणीभूत ठरतात.
३) जीवाश्म इंधनांचे ज्वलन – ऊर्जा निर्मितीसाठी कोळसा, तेल आणि गॅसच्या ज्वलनातून निर्माण होणारे घातक रसायनं व प्रदुषण पसरविणारे हानिकारक घटक वायुप्रदूषण वाढविण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत ठरतात.
४) कृषी क्षेत्रातील क्रिया – खतांचा, कीटकनाशकांचा वापर आणि पशुपालनाशी संबंधित मिथेन वायूचे उत्सर्जन हवेच्या गुणवत्तेस हानी पोहोचवते.
५) जंगलतोड – हवेत असलेले कार्बन डायऑक्साइड झाडे शोषून घेतात. जंगलतोड झाल्यास वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, त्यामुळे वायुप्रदूषणाचा धोकाही वाढतो.
६) घरगुती प्रदूषण – घरगुती स्वयंपाकासाठी किंवा घरात उष्णता निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणार्या घन इंधनामुळे घरात आणि बाहेर धूर तयार होतो, जो आरोग्यासाठी हानिकारक ठरतो.
७) नैसर्गिक आपत्ती – जंगलातील वणवा, ज्वालामुखीचा उद्रेक आणि धुळीचे वादळ यांसारख्या नैसर्गिक आपत्ती हवेच्या गुणवत्तेस गंभीर हानी पोहोचवू शकतात आणि वायुप्रदूषणाचे मोठे कारण ठरू शकतात.
८) पिकांचे अवशेष आणि कचरा उघड्यावर जाळणे – यामुळे निर्माण होणारे हानिकारक वायू हवेच्या गुणवत्तेस मोठ्या प्रमाणात नुकसान पोहोचवतात आणि गंभीर वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात.
९) जुनी इमारत पाडणे व नवे बांधकाम करणे – यामुळे मोठ्या प्रमाणात सूक्ष्म पदार्थ आणि धूळ हवेत मिसळते, ज्यामुळे वायू प्रदूषण अधिकच वाढते.
भारतात वायू प्रदूषणाची समस्या आणि तीव्रता प्रचंड प्रमाणात आहे. अनेक भारतीय शहरांमध्ये हवेची गुणवत्ता (AQI) अत्यंत वाईट किंवा गंभीर आहे. सध्या, अनेक भारतीय शहरं जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहरांमध्ये समाविष्ट आहेत, जिथे PM२.५ अशा उच्च पातळीमुळे आरोग्यविषयक गंभीर समस्या उद्भवत आहेत. जवळपास अनेक भारतीय नागरीक अशा भागांमध्ये राहतात, जे भाग WHO ने दिलेल्या हवेच्या गुणवत्तेच्या मार्गदर्शक तत्त्वांपेक्षा अधिक प्रदूषित आहेत. भारतातील प्रचंड प्रमाणातील वायू प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार, त्वचारोग आणि सरासरी आयुर्मान कमी होणे या गोष्टींचा धोका वाढला आहे.
वायू प्रदूषणामुळे मानवी आरोग्य, पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेवर अनेक हानिकारक परिणाम होतात. यांपैकी काही महत्त्वाचे दुष्परिणाम पुढीलप्रमाणे आहेत:
१. आरोग्यावर होणारे परिणाम
श्वसन रोग – सूक्ष्म पदार्थ (PM२.५, PM१०), नायट्रोजन ऑक्साइड (NO₂) आणि सल्फर डायऑक्साइड (SO₂) यांसारख्या प्रदूषकांमुळे अस्थमा, ब्रॉन्कायटिस आणि इतर फुफ्फुसांच्या रोगांचा धोका वाढू शकतो किंवा आधीपासून अस्तित्वात असलेल्या श्वसनसंस्थेचे आजार अधिक गंभीर होऊ शकतात.
हृदयविकाराचे आजार – प्रदूषित हवेत दीर्घकाळ राहिल्यास हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि उच्च रक्तदाब होण्याचा धोका वाढतो.
कर्करोग – हवेतून पसरणारे कर्करोगास कारणीभूत घटक जसे की बेंझिन आणि पॉलीसाइक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन (PAHs) हे प्रदूषित हवेत असतात आणि असे घटक फुफ्फुसांच्या कर्करोगाचा धोका वाढवू शकतात.
मस्तिष्क व मज्जासंस्थेचे विकार – हवेत उपस्थित असलेले शिसे आणि सूक्ष्म कणांसारख्या प्रदूषकांमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेत व विचारक्षमतेत घट होऊ शकते, ज्यामुळे प्रौढांमध्ये अल्झायमर आणि लहान मुलांमध्ये विकासाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
डोळे, नाक आणि घशात जळजळ – स्मॉग (धूर+धूके = धूरके) आणि इतर प्रदूषकांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे डोळ्यांची जळजळ, नाक आणि घशात जळजळ, अॅलर्जी आणि सायनस संसर्ग होऊ शकतो.
रोगप्रतिकारशक्ती कमी होणे – हवेत उपस्थित विषारी प्रदूषकांच्या दीर्घकाळ संपर्कामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
जन्मदोष आणि गर्भधारणेसंबंधी समस्या – वायुप्रदूषणामुळे उचित वेळेपूर्वी प्रसूती होण्याचा, कमी वजनाच्या बाळाचा जन्म होण्याचा आणि नवजात बालकांमध्ये विकासासंबंधी अडचणी निर्माण होण्याचा धोका वाढतो.
२. पर्यावरणीय परिणाम
जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदल – जास्त प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणामुळे ग्रीनहाऊस वायू (CO₂, मीथेन इ.) वातावरणातील उष्णता स्वतःत साठवून ठेवतात, ज्यामुळे वातावरणातील तापमान (ग्लोबल वॉर्मिंग) वाढते.
आम्लवर्षाव (अॅसिड रेन) – हवेत सल्फर डायऑक्साइड आणि नायट्रोजन डायऑक्साइड अतिरिक्त प्रमाणात असल्यास आम्लवर्षावाचा धोका वाढू शकतो, ज्यामुळे माती, जलसाठे आणि इमारतींचे नुकसान होऊ शकते.
ओझोन वायूचे आवरण कमी होणे – क्लोरोफ्लोरोकार्बन (CFCs) सारखे प्रदूषक ओझोन वायूच्या आवरणाचे नुकसान करतात, ज्यामुळे अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणोत्सर्गाचा धोका वाढतो.
वन्यजीवनास धोका – विषारी वायू प्रदूषक प्राण्यांसाठी हानिकारक ठरू शकतात, जैवविविधता कमी करून आणि पर्यावरणाचा समतोल बिघडवू शकतात.
माती व जलप्रदूषण – हवेतील प्रदूषक माती व पाण्यात मिसळल्यास शेती आणि जलजीवनाला (जलचर व पाण्यातील वनस्पती) मोठे नुकसान पोहोचवू शकतात.
३. आर्थिक परिणाम
आरोग्यावरील खर्च – वाढत्या आजारांमुळे वैयक्तिक आणि सरकारी आरोग्य सेवांवरील खर्च वाढतो.
उत्पादकतेत घट – प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे कार्यक्षमता कमी होते आणि अनुपस्थिती वाढते.
पायाभूत सुविधांचे नुकसान – आम्लवर्षाव आणि प्रदूषक घटक इमारती, स्मारके आणि वाहने यांना गंज चढतो किंवा त्यांची झीज होते व त्यामुळे त्यांचे नुकसान होते.
शेतीचे नुकसान – प्रदूषित हवेमुळे पिकांचे उत्पादन आणि जमिनीची सुपीकता कमी होते, ज्यामुळे अन्नटंचाई आणि आर्थिक नुकसान होते.
४. मानसिक आणि सामाजिक परिणाम
मानसिक आरोग्याविषयी समस्या – प्रदूषणाच्या सतत संपर्कामुळे तणाव, चिंता आणि नैराश्य यांचा धोका वाढतो.
जीवनमानाचा दर्जा खालावणे – खराब हवेच्या गुणवत्तेमुळे आपल्या घराबाहेरील कामे व उपक्रम यावर मर्यादा येते, आयुर्मान कमी होते आणि एकूणच जीवनमानाचा दर्जा खालवतो.
१. https://en.wikipedia.org/wiki/Air_pollution
२. https://www.nrdc.org/stories/air-pollution-everything-you-need-know
३. https://www.who.int/health-topics/air-pollution#tab=tab_1
४. https://pib.gov.in/newsite/printrelease.aspx?relid=110654
५. https://safar.tropmet.res.in/AQI-47-12-Details
६. https://www.airnow.gov/aqi/aqi-basics/
७. https://www.aqi.in/blog/en-in/10-main-causes-of-air-pollution/