जलप्रदूषणाचे धोके काय आहेत?
पाणी, जे जीवनाचे सार आहे, आता प्रदूषणामुळे एक गंभीर धोका बनले आहे. अशुद्ध पाणी केवळ आपल्या आरोग्यावर परिणाम करत नाही, तर पर्यावरण बिघडवते, अर्थव्यवस्था कमकुवत करते आणि जर आपण ते प्यायलो, स्वयंपाकात किंवा दैनंदिन गरजांसाठी वापरले, तर ते घातक ठरू शकते. या गंभीर धोक्यांना समजून घेणे हे त्यांना रोखण्याच्या दिशेने पहिले पाऊल ठरते.
1) मानवी आरोग्यावर परिणाम:
जलजन्य (पाण्यामुळे होणारे) आजार:
जीवाणू, विषाणू आणि परोपजीवींनी दूषित झालेले पाणी गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकते. अस्वच्छता, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि कारखान्यांद्वारे उत्पन्न झालेले टाकाऊ अवशेष यांमुळे हे जलजन्य रोग वाढतात, आणि म्हणूनच प्रतिबंधात्मक उपायांची तातडीने गरज आहे.
• जुलाबसंबंधी आजार: अशुद्ध पाण्यामुळे तीव्र जठरांत्रशोथ (अक्युट गॅस्ट्रोएन्टेरिटिस) आणि कॉलरा होतो, ज्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होते व गंभीर आजार निर्माण होऊ शकतात.
• आमांश: अतिसाराच्या या गंभीर स्वरूपामध्ये मलमध्ये रक्त आणि श्लेष्माचा समावेश असतो आणि जर त्यावर उपचार न झाल्यास ते जीवघेणे ठरू शकते.
• जिआर्डियासिस: हा एक परजीवी संसर्ग आहे, ज्यामुळे जुलाब, पेटके आणि मळमळ होते.
• हिपॅटायटिस ए: हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो दूषित पिण्याच्या आणि स्वयंपाकाच्या पाण्याद्वारे पसरतो आणि यामुळे यकृताला सूज येते व जळजळ होते.
• टायफॉईडचा ताप: हा अस्वच्छ पाण्यामुळे होणारा जीवाणूचा संसर्ग आहे, जो विशेषतः स्वच्छतेचा अभाव असलेल्या भागांमध्ये जास्त आढळतो.
2) इतर दीर्घकालीन आरोग्य समस्या:
दूषित पाणी केवळ तात्काळ धोका नसून — त्याचे दीर्घकालीन आणि अनेकदा न भरून निघणारे परिणामसुद्धा होतात:
• आर्सेनिकोसिस:
आर्सेनिकने दूषित झालेल्या पाण्याच्या (विशेषतः भूगर्भातील पाण्याच्या) दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास त्वचेचे नुकसान, अंतर्गत अवयव निकामी होणे आणि कर्करोगाचा धोका वाढतो.
• शिसे विषबाधा:
जुन्या पाईपलाईनमधून पाण्यात मिसळले गेलेले शिसे लहान मुलांमध्ये शारीरिक विकास, वर्तनातील आणि मेंदूशी संबंधित गंभीर समस्या निर्माण करू शकते. प्रौढांमध्ये हे उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाचे आजार, हृदयविकार आणि प्रजननासंबंधी अडचणी निर्माण करू शकते. ज्या घरांमध्ये जुना प्लंबिंग सिस्टम आहे आणि शिसे असलेल्या पाइप्स वापरल्या आहेत, अशा ठिकाणी धोका अधिक असतो. जेव्हा पाणी बराच वेळ अशा पाईपमध्ये साठून राहते, तेव्हा शिसे अधिक प्रमाणात पिण्याच्या पाण्यात मिसळू शकते.
• यकृत आणि मूत्रपिंडांचे नुकसान:
शिसे आणि कॅडमियम सारखे जड धातू, तसेच आर्सेनिक, कच्चे तेल इत्यादी इतर हानिकारक रसायने, कालांतराने यकृत आणि मूत्रपिंडासारख्या महत्त्वाच्या अवयवांना संथपणे (पटकन लक्षात न येण्यासारखे) नुकसान पोहोचवतात.
• मज्जासंस्थेचे विकार:
शिसे आणि पारा यांसारख्या जड धातूंच्या तसेच इतर विषारी रसायनांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे प्रौढ आणि मुलांमध्येही मज्जासंस्थेवर विषारी परिणाम होऊ शकतो. जलप्रदूषणामुळे होणाऱ्या मज्जासंस्थेशी संबंधित समस्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. कंप पावणे (थरथरणे)
२. परिधीय न्युरोपॅथी
३. स्मरणशक्ती कमी होणे आणि मूड स्विंग्स (मूड स्विंग्स म्हणजे आपल्या भावनांमध्ये अचानक होणारे बदल)
४. शिकण्याची अक्षमता आणि विकासात्मक विलंब
५. श्रवणशक्ती कमी होणे
६. पार्किन्सन आणि अल्झायमरच्या आजारांचा धोका वाढणे
• प्रजनन समस्या:
प्रदूषित पाण्याद्वारे एंडोक्राइन-बाधक रसायने, कीटकनाशके, जड धातू, आर्सेनिक इत्यादींच्या दीर्घकालीन संपर्कामुळे स्त्री आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन समस्यांचा धोका वाढतो. त्या समस्या पुढीलप्रमाणे आहेत:
१. एंडोमेट्रिओसिस आणि फायब्रॉइड्स
२. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम
३. गर्भधारणेमधील गुंतागुंत
४. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका
५. महिला आणि पुरुष दोघांमध्येही प्रजनन क्षमता कमी होणे
६. पुरुषांमध्ये वृषणाच्या कर्करोगाचा धोका
• विकासात्मक विकृती:
गर्भावस्थेदरम्यान विषारी पदार्थांचा संपर्क झाल्यास जन्मजात दोष आणि विकासात विलंब होऊ शकतो.
• हृदयविकार संबंधी समस्या:
प्रदूषित पाण्याच्या सेवनामुळे विषारी रसायने, जड धातू इत्यादींचा दीर्घकाळ संपर्क हानिकारक ठरू शकतो कारण त्यामुळे एंडोथेलियल डिसफंक्शन (अशी स्थिती ज्यामध्ये लहान धमन्यांच्या आतील अस्तराच्या कार्यात बिघाड होतो), ऑक्सिडेटिव्ह ताण (शरीरातील असंतुलन), सूज आणि जळजळ यांसारख्या विविध प्रक्रियांद्वारे हृदयविकार, स्ट्रोक आणि हृदयाच्या विफलतेचा (जेव्हा हृदयाचे स्नायू रक्त पुरवठा करत नाहीत तेव्हा) धोका वाढतो.
• श्वसन संबंधी समस्या:
प्रदूषित पाण्यात रसायने, जीवाणू आणि अॅलर्जन्ससारखे प्रदूषक असतात. या विषारी घटकांचा हवेमध्ये संचार झाल्यास व हे हवेतील विषारी पदार्थ श्वासाद्वारेआत घेतल्यास दमा (अस्थमा) चा झटका येऊ शकतो किंवा श्वसन नलिकांवर परिणाम होऊन क्रॉनिक ब्राँकायटिस (श्वसन नलिकांमध्ये सूज आणि कफ साचणे) यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
• त्वचेसंबंधी समस्या:
प्रदूषित पाण्याच्या संपर्कामुळे त्वचेवर चकते (पुरळ), एक्झिमा (इसब/गजकर्ण) आणि त्वचेसंबंधी संसर्ग होतात. दीर्घकालीन संपर्कामुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका देखील वाढू शकतो.
• कर्करोगाचा धोका वाढतो:
आर्सेनिक, जड धातू, विषारी रसायने इत्यादींसारख्या प्रदूषकांनी दूषित पाण्याचे दीर्घकालीन सेवनामुळे त्वचा, मूत्राशय, फुफ्फुसे, मूत्रपिंड आणि यकृताच्या कर्करोगाचा धोका ठळकपणे वाढतो.
3) पर्यावरणावर होणारे परिणाम:
• जलचरांचे नैसर्गिक निवासस्थानाचे नुकसान:
जल प्रदूषण जलजीवांसाठी अत्यंत विनाशकारी ठरते. कारखान्यांमधून निघणारा कचरा, शेतातील रसायने आणि सांडपाणी जलस्रोतांना विषारी बनवतात, ज्यामुळे ते मासे आणि इतर प्रजातींसाठी अयोग्य बनतात.
• अन्नसाखळीमध्ये बिघाड (अन्नसाखळी विस्कळीत होणे):
विषारी पदार्थांमुळे लहान जलजीव मरतात व त्यामुळे संपूर्ण अन्नसाखळीचा समतोल विस्कळीत होतो. जेव्हा विषारी द्रव्यांमुळे लहान मासे मरतात, संपूर्ण अन्न्साखळी कोलमडते, ज्याचा परिणाम मोठ्या माशांवर व समुद्री खाद्यपदार्थांवरअवलंबून असलेल्या माणसांवर होतो.
• घातक शैवाळांची वाढ (एच्. ए. बी. एस्.)::
अतिरिक्त खते आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी यामुळे पाण्यात शैवाळांची खूप वाढ होते. जास्त खत आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी यामुळे पाणवठ्यांमध्ये जास्त प्रमाणात शैवाल वाढतात. हे शैवाळ पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण कमी करतात, ज्यामुळे जलचरांचा श्वास गुदमरतो आणि माणसांसाठीही हे पाणी धोकादायक ठरते.
4) आर्थिक परिणाम:
• पुनरुज्जीवनाचा मोठा खर्च:
प्रदूषित जलस्रोतांची स्वच्छता ही केवळ पर्यावरणीय चिंतेची बाब नाही तर एक अत्यंत खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया देखील आहे. नष्ट झालेली जलसृष्टी पुन्हा उभी करण्यासाठी सरकार आणि समाजावर मोठा आर्थिक भार पडतो, ज्यामुळे जलप्रदूषणाचे गंभीर आर्थिक दुष्परिणाम ठळकपणे दिसून येतात.
• पर्यटन आणि मनोरंजनात्मक उपक्रमांमध्ये घट:
कचरा आणि विषारी पदार्थांनी प्रदूषित झालेले समुद्रकिनारे, नद्या आणि तलाव त्यांचे आकर्षण गमावतात. पर्यटक या क्षेत्रांना टाळतात, ज्यामुळे स्थानिक व्यवसाय आणि समुदायांचे मोठे आर्थिक नुकसान होते.
• मत्स्य व्यवसायावर परिणाम:
प्रदूषित पाण्यामुळे माशांची संख्या नष्ट होते, ज्यामुळे रोजगार कमी होतात आणि अन्नटंचाई निर्माण होते. मासेमारी उद्योग कोसळतात, लाखो लोकांच्या उपजीविकेवर त्याचा परिणाम होतो.
• आरोग्यसेवा खर्चात वाढ:
जल प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे रुग्णालयात जाण्याचे प्रमाण, औषधांचा खर्च आणि आरोग्यसेवेवरील ताण वाढतो, ज्यामुळे ही समस्या व्यक्ती आणि सरकार दोघांसाठीही खूप महागडी बनते.
जलप्रदूषणाशी संबंधित धोक्यांपासून प्रतिबंधक व संरक्षक उपाय:
प्रतिबंधक उपाय:
१. जल प्रदूषण रोखणे
• प्लास्टिक, रसायने किंवा तेल कधीही नाल्यांमध्ये किंवा नद्या, तलाव यांसारख्या पाण्याच्या स्रोतांमध्ये टाकू नयेत.
• घरात किंवा व्यावसायिक संकुलांमधील शौचालये किंवा सिंकमधून औषधे, रंग किंवा विषारी द्रव्ये वाहू देऊ नयेत.
• रासायनिक खतांऐवजी सेंद्रिय खते आणि नैसर्गिक कीटकनाशकांचा वापर करावा, जेणेकरून रसायनं पाण्यात मिसळणार नाहीत.
२. कचर्याचे योग्य व्यवस्थापन:
• कचरा टाकण्यापूर्वी, निर्धारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सेंद्रिय (सडणारा) आणि असेंद्रिय (न सडणारा) असे योग्य प्रकारे वर्गीकरण करावे.
• जैविक कचरा पाण्यात टाकण्याऐवजी त्याचे कंपोस्ट तयार करण्यास प्रोत्साहन द्यावे.
• प्लास्टिक व कारखान्यांमधून तयार होणाऱ्या कचऱ्याचा कचऱ्याचे पुनर्वापर (रिसायकल) करा, जेणेकरून प्रदूषण कमी होईल.
३. कारखान्यांमधून निघणाऱ्या कचऱ्याची आणि सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट
• कारखाने व सांडपाणी प्रक्रिया केंद्रांनी, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून हे सुनिश्चित करवे की विषारी कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया विल्हेवाट लावली आहे. तो कचरा थेट नदी किंवा तलावात सोडू नये.
• शहरांमध्ये प्रभावी सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा उभारावी, जेणेकरून स्थानिक जलस्रोत प्रदूषित होणार नाहीत.
• कोणत्याही प्रकारची गळती होऊ नये आणि पाणी दूषित होऊ नये यासाठी घरगुती सेप्टिक टँकची नीट देखभाल करावी.
४. पाण्याचा अपव्यय कमी करावा
• गळती त्वरित दुरुस्त करुन घ्यावी – नळ गळतीमुळे पाण्याचा खूप मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो.
• पाणी-कार्यक्षम उपकरणं वापरावीत – उर्जेची बचत करणाऱ्या डिशवॉशर, वॉशिंग मशीन आणि लो-फ्लो (कमी प्रवाहाचा) नळ वापरावा.
• पावसाचं पाणी साठवावे – स्वच्छता आणि बागकाम यासारख्या पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर कारणांसाठी हे पाणी वापरता येते.
• शाश्वत सिंचन – शेतीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा, ज्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो.
संरक्षक उपाय
१. पिण्याच्या पाण्याची सुरक्षितता सुनिश्चित करावी:
• शुद्ध पाणी प्यावे – नेहमी गाळलेले, उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणीच प्यावे.
• सुधारित फिल्टरेशनचा वापर करावा – शक्य असल्यास आरओ किंवा यूव्ही वॉटर प्युरिफायरचा वापर करावा, जेणेकरून हानिकारक दूषित पदार्थ काढून टाकले जातात.
• पावसाचे पाणी स्वच्छ आणि झाकलेल्या भांड्यात साठवावे – हे पाणी धुणे, अंघोळ, बागकाम यासाठी सुरक्षित आहे.
२. वैयक्तिक व पर्यावरणीय स्वच्छता राखावी:
• साबण व स्वच्छ पाण्याने वारंवार हात धुवा – विशेषतः खाण्यापूर्वी आणि शौचालयानंतर.
• शक्य असल्यास, दूषित किंवा प्रदूषित जलसाठ्यांमध्ये आंघोळ करणे टाळावे.
• डास आणि जीवाणूंची पैदास रोखण्यासाठी आपल्या आजूबाजूचा परिसर साफ व स्वच्छ ठेवावा.
३. सामुदायिक जागरूकता आणि सहभाग निर्माण करणे:
• जागरूकता पसरवणे: स्वच्छ पाण्याचे महत्त्व व प्रदूषण टाळण्याचे उपाय याविषयी समाजात जागृती निर्माण करावी.
• स्वच्छता मोहिमा राबवावी: नद्या, तलाव आणि इतर जलस्रोत स्वच्छ करण्यासाठी स्वत:हून सहभाग घ्यावा.
४. सरकारी नियमांना पाठिंबा द्यावा व त्याचे पालन करावे:
• कारखान्यांमधून त्यार होणारा कचरा टाकण्यावर मर्यादा आणणाऱ्या सरकारी धोरणांना पाठिंबा द्यावा व त्याचे पालन करावे.
• सरकारी संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या जलसंवर्धन कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावे.
• शाश्वत, जलसुरक्षित उत्पादन पद्धतींचा अवलंब करणाऱ्या पर्यावरणपूरक व्यवसायांना पाठिंबा द्यावा.
या उपायांचा अवलंब केल्यास आपण जल प्रदूषण टाळू शकतो, आपले आरोग्य, पर्यावरण आणि भावी पिढ्यांचे त्याच्या हानिकारक परिणामांपासून संरक्षण करू शकतो.
REFERENCES:
1. https://www.nrdc.org/stories/water-pollution-everything-you-need-know#causes
2. https://bbrc.in/wp-content/uploads/2021/03/053-WATER-POLLUTION-IN-INDIA-CAUSES.pdf
3. https://www.frontiersin.org/journals/environmental-science/articles/10.3389/fenvs.2022.880246/full
4. https://online.ecok.edu/articles/causes-of-water-pollution/
5. https://www.medicalnewstoday.com/articles/water-pollution-and-human-health
6. https://www.niehs.nih.gov/health/topics/agents/water-poll
7. https://www.epa.gov/p2/pollution-prevention-tips-water-conservation
8. https://pib.gov.in/Pressreleaseshare.aspx?PRID=1814499
9. https://theiashub.com/upsc/upsc-notes/water-pollution-in-india/
10. https://www.careinsurance.com/blog/health-insurance-articles/adverse-effects-of-water-pollution-on-human-health