थालीपीठ हि महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असलेली एक घरगुती पाककृती आहे. थालीपीठ हे वेगवेगळी धान्ये भाजून व दळून मिळालेल्या पिठा पासून (भाजणी) बनवले जाते. हे पौष्टिक नक्कीच आहे पण ह्या मध्ये कॅलरीज् पण भरपूर असतात. हे टाळण्यासाठी खाली दिलेली "तांदळाचे पीठ आणि मिक्स भाज्यांचे थालीपीठ" बनवण्याची रेसिपी (व्हिडिओ आणि लिखित) आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करू शकेल कारण, अशा प्रकारे तांदळाचे पीठ आणि मिक्स भाज्या वापरून बनवलेले थालीपीठ हाच पौष्ठिकतेशी तडजोत न करता कमी कॅलरी युक्त चांगला पर्याय ठरू शकतो.
मिक्स भाज्यांचे थालीपीठ
साहित्य (६-७ थालीपीठ बनवण्यासाठी पुरेसे)
•मुख्यसाहित्य: १. गाजर - १ (मध्यम आकाराचे ) २. दुधीभोपळा- १०० ग्रॅम ३. लालभोपळा - १५० ग्रॅम ४. कोबी - १०० ग्रॅम ५. बटाटे - २ (मध्यम आकाराचे) ६. तांदळाचे पीठ - ३ टेबल स्पून
•मसाले : १. संडे मसाला : १ टी स्पून २. आलं - लसूण - मिरची - कोथिंबीर पेस्ट (वाटण). ३. धना - जीरा पावडर - १ टी स्पून ४. चाट मसाला - १/२ टी स्पून ५. मीठ - चवी प्रमाणे ६. लिंबाचा रस - पर्यायी ७. तेल - ब्रशिंग साठी
पध्दत :
१. सर्व भाज्या व्यवस्थित धुवून घ्याव्यात.
२. त्या नंतर गाजर, दुधी आणि लालभोपळ्याची सालं काढून घ्यावीत.
३. बटाटे उकडून घ्यावेत आणि मग त्याची साल काढावी.
४. बटाटे सोडून इतर सर्व भाज्या व्यवस्थित किसून घ्याव्यात आणि एकमेकात नीट मिक्स करून घ्याव्यात.
५. त्या नंतर किसलेल्या आणि मिक्स केलेल्या सर्व भाज्या २० मिनिटांसाठी कोमट पाण्या मध्ये भिजत ठेवाव्यात.
६. २० मिनिटां नंतर कोमट पाणी गाळून काढून टाकावे व ह्या किसलेल्या भाज्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात.
७. आता भाज्यां मधील सर्व पाणी नीट गाळून घ्यावे व त्या शक्य तितक्या कोरड्या कराव्यात.
८. उकडलेले बटाटे सोडून इतर सर्व भाज्या एका कढई मध्ये घेऊन नीट वाफवून घ्याव्यात. या करता गॅस शेगडीचा, स्टोव्हचा किंवा इंडक्शनप्लेट ( हॉटप्लेट ) चा वापर करू शकता.
९. आता उकडलेले बटाटे स्मॅश करा.
१०. आता वाफवलेल्या भाज्यां मध्ये उकडून स्मॅश केलेले बटाटे आणि तांदळाचे पीठ नीट मिसळा.
११. ह्या मध्ये साहित्यात दिलेले मसाले (संडे मसाला, चाट मसाला, धना-जीरा पूड, आलं-लसूण-मिरची-कोथिंबीर वाटण आणि चवी प्रमाणे मीठ) घाला.
१२. सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत नीट मिसळा आणि त्याचे छोटे छोटे गोळे बनवा (साधारण ६-७).
१३. आता उपलब्धतेनुसार गॅस शेगडी / स्टोव्ह किंवा हॉटप्लेटवर तवा गरम करत ठेवा व त्याला ब्रशने २-३ थेंब तेल लावून घ्या.
१४. आता मिश्रणाचे बनवलेले गोळे एका प्लस्टिकवर हाताने नीट थापून घ्या आणि मग हि थापलेली थालिपीठं भाजण्यासाठी तव्यावर ठेवा.
१५. हि थालिपीठं दोन्ही बाजूनी (गोल्डन ब्राऊन होई पर्यंत) नीट भाजून घ्या.
१६. आता तुमची लो कॅलरी मिक्स भाज्यांची थालिपीठं तयार झाली.
१७. ह्या गरम गरम थालिपीठांची मजा घरगुती चटणी बरोबर किंवा दह्या बरोबर लुटुयात.