मेयोनीझ सारखा सॉस आणि तो सुद्धा अंड, लोणी, तेल, दूध, चीझ, साय न वापरता! तुम्ही म्हणत असाल हे अशक्य आहे. पण नाही थांबा! हे शक्य आहे. दही, भात, उकडलेला बटाटा आणि डेक्सट्रोस वापरून तुम्ही हा मेयनीझ सारखा सॉस बनवू शकता, हा इतका चविष्ट आहे कि तुम्ही फरक सांगू शकणार नाही. ह्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या घटकांमुळे ह्यात खूपच कमी कॅलरी आहेत, त्यामुळे तुम्ही हा सॉस बिनधास्त खाऊ शकता. हा सॉस बनवायला सुद्धा एकदम सोपा आहे. पुढे दिलेली रेसिपी तुम्हाला ह्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करेल.
कमी कॅलरी युक्त मेयोनीझ सारखा सॉस
साहित्य
१. दही - ६ टेबल स्पून २. भात - ३ टेबल स्पून ३. डेक्सट्रोज - ३ टेबल स्पून ४. मीठ - १ टी स्पून ५. लिंबाचा रस - २ टी स्पून ६. रेडीमेड मस्टर्ड (मोहरी) पूड - १ टी स्पून ७. उकडलेला बटाटा - १ (मध्यम आकाराचा)
कृति :
१. प्रथम उकडलेला बटाटा नीट कुस्करून घ्या. २. त्यानंतर उकडून कुस्करलेल्या बटाट्यासोबत साहित्यात दिलेले सर्व पदार्थ जसे: दही, भात, डेक्सट्रोज, मस्टर्ड (मोहरी) पूड, लिंबाचा रस आणि मीठ एका मिक्सर मध्ये घाला. ३. मिक्सर मध्ये हे सर्व पदार्थ एकजीव करून घ्या जेणेंकरू त्याचे अतिशय स्मूथ मिश्रण तयार होईल. ४. हे मिश्रण फ्रीझ मध्ये एक तासासाठी थंड होण्यासाठी ठेवा. ५. हा झाला तुमचा मेयनीझ सारखा सॉस तयार.
सूचना:
· हा सॉस बनवताना आपण कोणत्याही प्रिझर्वेटिव्ह (मीठ सोडून) चा वापर केलेला नसल्यामुळे बनवल्यापासून २-३ दिवसांच्या आत वापरून संपवावा.
· हा मेयनीझ सारखा सॉस आपण खालील गोष्टींसाठी वापरू शकता:1. सॅलड्स 2. सँडविच किंवा बर्गर 3. चिप्स साठी डीप म्हणून