Sun Jun 11 2023
समोसा, भजी यांसारख्या स्वादिष्ट आणि कुरकुरीत पदार्थांची मजा लुटायची तर सोबत सॉस हवाच. तो सुद्धा जर आंबट-गोड असेल तर अजूनच धमाल. पण सतत असा सॉस खात राहणे आरोग्याच्या दृष्टीने नक्कीच हानीकारक आहे कारण सॉस बनवताना त्याचा टिकाऊपणा वाढवण्यासाठी त्यामध्ये अनेक प्रिझर्वेटिव्हस मिसळले जातात जे जास्त प्रमाणात खाणे नक्कीच चांगले नाही. मग आता काय करावे? काळजी करू नका , ह्यावर उपाय नक्कीच आहे. आपण असा आंबट-गोड सॉस आपल्या घरी नक्कीच तयार करू शकतो आणि तो सुद्धा कोणते ही प्रिझर्वेटिव्ह न मिक्स करता. खाली दिलेली रेसिपी ह्या करता तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू शकेल.
खट्टा मीठा सॉस
साहित्य
• मुख्यसाहित्य:
१. टोमॅटो- ४ (मध्यम आकाराचे) २. कांदा - १ (मध्यम आकाराचा) ३. मीठ - चवी प्रमाणे ४. डेक्सट्रोस - ४ टेबल स्पून. ५. चाट मसाला - १/४ टी स्पून. ६. संडे मसाला - १/४ टी स्पून. ७. धणे- जीरे पूड - १/४ टी स्पून.
१. सर्व टोमॅटो प्रथम पाण्याने नीट धुवून घ्या.
२. टोमॅटों वर ४ खाचा करून घ्या जेणेकरून टोमॅटोची साल काढणे सोपे पडेल.
३. कांदा चार तुकड्यां मध्ये चिरून घ्या.
४. आता सर्व टोमॅटो आणि चिरलेला कांदा प्रेशर कुकर मध्ये उकडून (शिजवून) घ्या. (साधारणपणे कूकर च्या ३ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे).
५. शिजवून झाल्यावर थोडावेळ थंड होण्यासाठी ठेवा.
६. चारही टोमॅटोंची साले आता काढून घ्या.
७. उकडलेले आणि सालं काढलेले टोमॅटो आणि कांदा मिक्सर मध्ये नीट वाटून घ्या.
८. मिक्सर मध्ये वाटून त्याचे मिश्रण बनल्यानंतर, जास्तीचे पाणी आणि बियाकाढून टाकण्यासाठी नीट गाळून घ्या.
९. हे गाळून घेताना निघालेले जास्तीचे पाणी व्हेजिटेबल स्टॉक म्हणून सुद्धा वापरता येईल.
१०. आता उपलबद्धते नुसार हॉट प्लेट, गॅस शेगडी किंवा स्टोव्हवर एक कढई गरम करायला ठेवा व त्यामध्ये कृती ८ मध्ये तयार झालेले मिश्रण घाला.
११. कढई मध्ये शिजत असताना ह्या मिश्रणामध्ये साहित्या मध्ये दिलेले सर्व मसाले (चाटमसाला, संडे मसाला, धने- जीरे पूड, ई.) मिक्स करा व मिश्रण सतत ढवळत रहा.
१२. मिश्रण हे फार पातळ किंवा फार घट्ट असू नये.
१३. सर्व मसाले मिक्स करून झाल्या नंतर मिश्रणामध्ये चवी प्रमाणे मीठ आणि डेक्सट्रोस घाला.
१४. मिश्रणामध्ये गोळे तयार होऊ नयेत म्हणून हे कढई मध्ये शिजत असताना सतत ढवळत रहा.
१५. मिश्रण उकळायला लागले व आवश्यक प्रमाणात घट्ट झाले कि शेगडी/हॉटप्लेट/स्टोव्ह बंद करा आणि मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.
१६. आता तुमचा खट्टा मीठा सॉस तयार झाला आहे.
१७. सॉस पूर्णपणे थंड झाल्यानंतर बाटली मध्ये भरून फ्रीझ मध्ये ठेवा.
१८. हा सॉस बनवताना आपण मीठ सोडल्यास दुसऱ्या कुठल्याही प्रिझर्वेटीव्हचा वापर केलेला नाही. त्यामुळे तो जास्तीत जास्त २-३ दिवस टिकतो, म्हणून शक्यतो नेहमी हा सॉस ताजा बनवणे चांगले.
१९. तुमच्या आवडत्या खाद्यपदार्था बरोबर ह्या सॉसचा आनंद लुटावा.
सूचना: खट्टा मीठा सॉसच्या ऐवजी जर साधा टोमॅटो सॉस बनवायचा झाल्यास मिश्रणामध्ये फक्त चवीपुरते मीठ, चिमूट भर संडे मसाला आणि डेक्सट्रोस एवढेच मिक्स करावे बाकीचे मसाले मिक्स करू नयेत. बाकी सर्व कृती वर दिल्याप्रमाणेच करावी.