रंग आपल्या अन्नाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनावर मोठा प्रभाव टाकतात. अनेकदा आपण एखादा पदार्थ चाखण्याआधीच, केवळ त्याच्या रंगावरून त्याच्याकडे आकर्षित होतो. हे काही योगायोगाने घडत नाही; रंग आपल्या संवेदनांवर परिणाम करतात. वैज्ञानिक संशोधनानुसार, अन्नाचा रंग आपण त्याची चव कशी अनुभवतो यावर परिणाम करू शकतो. आपला मेंदू नैसर्गिकरित्या काही विशिष्ट रंगांना विशिष्ट चवींशी जोडतो, आणि त्यावरून आपण तो पदार्थ खाणार की नाही हे ठरवतो.
दृष्टीने आकर्षक दिसणारे अन्न अधिक विकले जाते हे लक्षात घेऊन, जगभरातील आणि भारतातीलही, खाद्य उत्पादक कंपन्या त्यांच्या उत्पादनांमध्ये वारंवार रंग घालतात.
पॅकेजबंद आणि प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांची मागणीत झालेल्या प्रचंड वाढीसोबतच, खाद्य रंगांच्या (रंगद्रव्यांच्या) वापराचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. आज, सुपरमार्केटमधील जवळजवळ प्रत्येक वस्तूमध्ये, स्नॅक्सपासून ते तयार जेवणापर्यंत, सर्व खाद्य पदार्थांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारचा रंग मिसळलेला असतो.
ही प्रवृत्ती फक्त पॅकेजबंद वस्तूंपुरती मर्यादित नाही, तर उपाहारगृहे, रस्त्यावरील विक्रेते आणि कॅफेमध्ये देखील पदार्थांना आकर्षक बनवण्यासाठी खाद्य रंगांचा वापर करतात. कारण रंगाची एखादी हलकी छटा देखील ग्राहकाच्या नुसत्या कटाक्षाला खरेदीच्या निर्णयात बदलू शकते.
खाद्य रंग किंवा खाद्य रंगद्रव्ये ही अन्नाला कृत्रिम रंग देऊन त्याचे स्वरूप अधिक आकर्षक करण्यासाठी वापरली जाणारी रसायने आहेत. त्यांचा वापर १८५६ मध्ये कोळशाच्या डांबरापासून (Coal Tar) तयार केलेल्या रंगांपासून सुरू झाला. आज, उत्पादक नैसर्गिक रंगांपेक्षा कृत्रिम खाद्य रंगांना अधिक प्राधान्य देतात, कारण ते अधिक उठावदार व मोहक छटा प्रदान करतात.
तथापि, कृत्रिम खाद्य रंग हे रसायनांवर आधारित असल्याने, त्यांच्या संभाव्य आरोग्यधोक्यांविषयीची चिंता वाढत चालली आहे.
या लेखामध्ये सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या खाद्य रंगांचे प्रकार, त्यांचा सर्वसाधारण वापर, तसेच भारतीय अन्नसुरक्षा व मानक प्राधिकरण (FSSAI) ने ठरवलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात त्यांचे सेवन केल्यास होणारे आरोग्यधोके यांचा आढावा घेण्यात आला आहे.
या मालिकेच्या पहिल्या भागात आपण लाल खाद्य रंगांवर लक्ष केंद्रीत करू - त्यांचे प्रकार, गुणधर्म, उपयोग आणि त्यासंबंधित आरोग्यधोके पाहू.
दुसऱ्या भागात आपण पिवळ्या खाद्य रंगांबद्दल - त्यांचे प्रकार, गुणधर्म, उपयोग आणि त्यासंबंधित आरोग्यधोके—यांचा आढावा घेऊ.
अखेरच्या (तिसऱ्या) भागात इतर खाद्य रंग, त्यावरील प्रतिबंधक उपाय आणि कृत्रिम खाद्य रंगांना आरोग्यदायी पर्याय यांचा आढावा घेऊ.
चला, आता कृत्रिम लाल खाद्य रंगांपासून चर्चा सुरू करूया.
लाल खाद्य रंग :
हा एक कृत्रिम खाद्य रंग आहे जो खाद्यपदार्थ आणि पेयांना आकर्षक चेरी लाल रंग देतो. सामान्य तापमानावर तो लाल भुकटीच्या स्वरूपात असतो. फिनॉल आणि फ्थॅलिक ॲनहायड्राइड यांच्या संयोगातून फ्लुरोसिन तयार केले जाते, ज्यावर आयोडिनेशन (आयोडीकरण) केल्यास "एरिथ्रोसिन" नावचे गडद लाल रंगद्रव्य तयार होते. यालाच (E-127) या क्रमांकाने ओळखले जाते.
हे कुठे वापरले जाते?
अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये, औषधांमध्ये आणि सौंदर्यप्रसाधनांमध्ये एरिथ्रोसिन हा कृत्रिम खाद्य रंग आढळू शकतो. उदाहरणार्थ:
A) खाद्यपदार्थ:
B) औषधनिर्मितीमध्ये वापर:
C) सौंदर्यप्रसाधने:
(गडद गुलाबी ते लाल रंगछटांच्या विविध श्रेणीसाठी)
आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम व धोके:
इरिथ्रोसिन या कृत्रिम खाद्य रंगाचे दीर्घकालीन सेवन केल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. लहान मुलांचे शरीरभार व वजन प्रौढांच्या तुलनेत कमी असल्यामुळे, अगदी अल्प प्रमाणात देखील हा रंग सेवन केल्यास त्यांच्यामध्ये हे दुष्परिणाम अधिक तीव्र स्वरूपात दिसून येऊ शकतात.
A) थायरॉईड ग्रंथीचे कार्यबिघाड:
अभ्यासानुसार, इरिथ्रोसिनमध्ये आयोडीन असते. त्याचे अति किंवा दीर्घकालीन सेवन केल्यास थायरॉईड संप्रेरकांच्या (हॉर्मोन्स) सामान्य नियमनात बिघाड होऊ शकते आणि परिणामी थायरॉईड ग्रंथीचे विकार उद्भवू शकतात, आणि गंभीर परिस्थितीत थायरॉईड गाठी (ट्यूमर) निर्माण होण्याची शक्यता असते.
B) लहान मुलांमधील वर्तणुकीवर होणारे परिणाम:
या कृत्रिम खाद्य रंगाचे नियमित सेवन करणाऱ्या मुलांमध्ये एडीएचडीसारखी लक्षणे (चंचलपणा, चिडचिड, लक्ष कमी केंद्रित होणे, अतिसक्रियता / अतिचंचलता इत्यादी) दिसून येऊ शकतात. हे रंग (एरिथ्रोसिन) मेंदूतील न्यूरोट्रान्समीटरच्या कार्यात अडथळा निर्माण करून मज्जासंस्थेतील संदेशवहन बिघडवतो, ज्यामुळे वर्तनामध्ये बदल होऊ शकतात.
C) कर्करोगाचा धोका:
इरिथ्रोसिनच्या दीर्घकालीन सेवनामुळे शरीरात होणारे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस (Oxidative stress) आणि फ्री रॅडिकल्स (free radicals) डीएनएला (DNA) हानी पोहोचवू शकतात, ज्यामुळे कर्करोग (malignancy) होण्याचा धोका वाढतो. हा धोका विशेषतः खालील गटांमध्ये अधिक असतो:
D) रक्तपेशींना होणारी हानी:
इरिथ्रोसिनच्या सेवनामुळे निर्माण होणारे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्स डीएनएला हानी पोहोचवू शकतात आणि रक्तपेशींच्या (blood cells) कार्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात, यामुळे पुढील आरोग्यसंबंधी गुंतागुंत आणि आजार उद्भवण्याची शक्यता वाढते.
सुरक्षित सेवन मर्यादा किती आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, इरिथ्रोसिनचा वापर कृत्रिम खाद्य रंग म्हणून केवळ मर्यादित प्रमाणात करण्यास परवानगी आहे (साधारणतः अन्नाच्या प्रकारानुसार १०० पीपीएम किंवा १०० मिलीग्राम/किलो). इरिथ्रोसिनच्या सेवनासाठी स्वीकारार्ह दैनिक सेवन (Acceptable Daily Intake - ADI) ०-०.१ मिलीग्राम/किलो शरीराचे वजन/दिवस आहे.
2. अल्लूरा रेड (रेड क्र. ४०): (E-129):
हा एक कृत्रिम खाद्य रंग आहे जो अन्नपदार्थांना गडद लाल रंग देतो. हि एक बारीक दळलेली लाल पावडर असून, जी विविध खाद्यपदार्थांमध्ये आणि अनेक औषध व सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरली जाते. हि पावडर एक कृत्रिम अझो (Azo) संयुग आहे, जीला E-129 या क्रमांकाने ओळखले जाते.
हे कुठे वापरले जाते?
हे सामान्यतः अनेक खाद्यपदार्थ, औषधे, सौंदर्यप्रसाधने इत्यादींमध्ये वापरले जाते, उदाहरणार्थ:
A) खाद्यपदार्थ :
शीतपेय - सॉफ्ट ड्रिंक्स (ऑरेंज किंवा फ्रूट पंच फ्लेवर), एनर्जी ड्रिंक्स, पावडर ड्रिंक मिक्स.
कन्फेक्शनरी जसे की कँडीज, जेलीज, च्युइंग गम, लॉलीपॉप्स, गमीज, इत्यादी.
केक, केक आयसिंग आणि डेकोरेशन्स, कुकीज, पेस्ट्रीज, इत्यादी.
प्रक्रिया केलेले अन्न जसे की रंगीत चिप्स, नमकीन, इत्यादी.
फ्लेवर्ड योगर्ट्स (दही), आईस्क्रीम्स, फ्रोझन डेझर्ट्स.
इंस्टंट जेली मिक्स/तयार जेली कप.
रंगीत सिरियल्स/फ्रूट लूप्स.
सॉस आणि सॉसचे प्रकार जसे की टोमॅटो केचप, चिली सॉस, सॅलड ड्रेसिंग्ज.
उपहारगृह आणि रस्त्यावरील विक्रेत्यांकडील शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ.
B) औषधनिर्मितीमध्ये वापर:
C) सौंदर्यप्रसाधने: (गुलाबी, लाल आणि कोरल शेड्स तयार करण्यासाठी)
आरोग्यावर होणारे संभाव्य दुष्परिणाम व धोके:
A) अतिसक्रियता आणि वर्तणुकीत बदल:
वैज्ञानिक अभ्यासानुसार, या कृत्रिम खाद्य रंगाचे दीर्घकाळ किंवा अति प्रमाणात सेवन केल्यास मुलांमध्ये एडीएचडीसारखी लक्षणे (चिडचिडेपणा, अतिसक्रियता / अतिचंचलता, अस्वस्थता, एकाग्रतेचा अभाव) आणि वर्तणुकीत बदल होण्याचा धोका वाढू शकतो. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात न्यूरोट्रान्समीटर्स (डोपामाइन आणि सेरोटोनिन) यांतील असमतोल, हिस्टामाइनचा जास्त प्रमाणात स्राव, जस्त (झिंक), लोह आणि मॅग्नेशियमच्या पातळीत घट, आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडून दाह प्रतिक्रिया किवा सूज येणे आणि आतड्यच्या-मेंदूच्या (गट-ब्रेन अक्ष) मध्ये होणारा व्यत्यय यांचा समावेश आहे.
B) ॲलर्जीक प्रतिक्रिया:
या कृत्रिम खाद्य रंगाच्या दीर्घकाळ किंवा अल्पकालीन, कधीकधी अचानक संपर्कात आल्यास संवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात. या प्रतिक्रियांमध्ये सौम्य स्वरूपाची लक्षणे आढळतात, जसे की अंगावर पित्त उठणे, त्वचेवर खाज सुटणे, त्वचेवर पुरळ उठणे; तसेच गंभीर लक्षणे, जसे की शरीरावर उष्णता जाणवणे, श्वास घेण्यास त्रास होणे, दमा-सदृश लक्षणे, मळमळ आणि संपर्कजन्य त्वचारोग (contact dermatitis) यांचा समावेश असतो. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे ही असू शकतात, ज्यात दाह किवा सूज निर्माण करणाऱ्या रसायनांचा स्राव (हिस्टामाइन, प्रोस्टॅग्लँडिन्स, ल्युकोट्रिएन्स) आणि आंत्रातील संरक्षक पडदा (Intestinal barrier) बाधित होणे (लीकी गट सिंड्रोम), ज्यामुळे परकीय ॲन्टिजेन्सना रक्तप्रवाहात प्रवेश करून ॲलर्जीक प्रतिक्रिया निर्माण करतात.
C) मायग्रेनचा झटका उद्भवण्याचा धोका:
या कृत्रिम खाद्य रंगाच्या सेवनामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये मायग्रेनचे झटके सुरू होऊ शकतात. यामागील अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात हिस्टामाइनच्या स्रावामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांचे प्रसरण, ग्लूटामाइन (एक उत्तेजक न्यूरोट्रान्समीटर) ची वाढलेली क्रियाशीलता आणि हिस्टामाइन व्यतिरिक्त इतर दाह किंवा सूज निर्माण करणाऱ्या रसायनांचा स्राव यांचा समावेश आहे.
D) अन्न पचन असमर्थता (Food Intolerance):
काही प्रसंगी या कृत्रिम खाद्यरंगाचे सेवन केल्याने अन्न पचन असमर्थतेची लक्षणे होऊ शकतात, जसे की पोट बिघडणे, मळमळ आणि पोटदुखी/ पोटात कळा येणे. यामागील अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, जसे आतड्यांमधील जीवाणूंच्या रचनेत बदल, म्हणजेच हानिकारक जीवाणूंची वाढलेली संख्या असू शकते. जास्त ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे पेशींच्या कार्याला हानी पोहोचते आणि रोगप्रतिकारशक्ती सक्रिय होऊन दाह किंवा सूज निर्माण होते.
E) आतड्यांच्या दाहक रोगाचा (Inflammatory Bowel disease) धोका :
काही प्राण्यांवर केलेल्या संशोधनानुसार, अल्लूरा रेड या खाद्य रंगाचे दीर्घकाळ सेवन केल्याने आतड्यांमधील सूक्ष्मजीवाणूंच्या रचनेत बदल होऊ शकतो. याव्यतिरिक्त, यामुळे दाह किंवा सूज निर्माण करणाऱ्या रसायनांचा स्राव होऊ शकतो, ज्यामुळे आतड्यांच्या दाहक रोगांचा (उदा. अल्सरेटिव्ह कोलायटिस आणि क्रॉन्स डिसीज) धोका वाढतो.
F) कर्करोगाचा संभाव्य धोका:
काही अभ्यासानुसार, या खाद्य रंगाच्या दीर्घकाळ सेवनामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्स तयार होतात, ज्यामुळे डीएनएला हानी पोहोचू शकते. डीएनएला झालेल्या हानीमुळे उत्परिवर्तन (म्युटेशन) होऊ शकते आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो.
सुरक्षित सेवन मर्यादा किती आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, अल्लूरा रेड/रेड नं. ४० ला कृत्रिम खाद्य रंग म्हणून केवळ मर्यादित प्रमाणात वापर करण्यास परवानगी आहे (साधारणपणे १०० पीपीएम किंवा १०० मिलीग्राम/किलो, खाद्यपदार्थांच्या प्रकारानुसार). काही विशिष्ट खाद्यपदार्थांमध्ये ही मर्यादा २०० पीपीएम किंवा २०० मिलीग्राम/किलो पर्यंत वाढू शकते. अल्लूरा रेडच्या (रेड नं. ४०) स्वीकारार्ह दैनिक सेवनाची (Acceptable Daily Intake - ADI) मर्यादा ७ मिलीग्राम/किलो शरीराचे वजन/दिवस इतकी आहे.
3. कारमोइसिन (अझोरुबिन): (E-122)
हा एक कृत्रिम लाल खाद्य रंग आहे, जो जो किण्वन (Fermentation) झाल्यानंतर उष्णतावापर (Heat Treatment) केल्यावर अन्नपदार्थांना लाल रंग प्रदान करतो. सामान्य तापमानावर तो लाल, अनाकार स्थायू (amorphous solid) घन स्वरूपात आढळतो आणि पाण्यात खूप सहज विरघळतो. रासायनिकदृष्ट्या, हा एक अझो डाई (Azo Dye) असून, यात दोन नेफथॅलीन (Naphthalene) उपघटक (subunits) असतात. याला E-122 या क्रमांकाने दर्शवले जाते.
हे कुठे वापरले जाते?
कार्मोझिन (Carmoisine) किंवा अझोरुबिन (Azorubine) हा एक कृत्रिम रंगद्रव्ययुक्त (Synthetic) खाद्यरंग आहे, जो विविध प्रकारच्या अन्नपदार्थांच्या तयारीत, औषधनिर्मितीत तसेच सौंदर्यप्रसाधनांमध्ये वापरला जातो. उदाहरणार्थ :
A) खाद्यपदार्थ:
B) औषधनिर्मितीमध्ये वापर: (लाल किंवा गुलाबी रंग देण्यासाठी)
C) सौंदर्यप्रसाधने:
संबंधित आरोग्य धोके:
A) ॲलर्जीक प्रतिक्रिया:
याच्या सेवनामुळे संवेदनशील व्यक्तींमध्ये ॲलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात, ज्यामध्ये सौम्य स्वरूपाच्या प्रतिक्रियेमूळे अंगावर पित्त उठणे (Urticaria) आणि खाज सुटण्यापासून ते अधिक गंभीर स्वरूपाच्या प्रतिक्रियेमूळे श्वास घेण्यास त्रास होणे, घरघर लागणे आणि दम्यासारखी लक्षणे यांचा समावेश असतो. खूप गंभीर प्रकरणांमध्ये, ॲनाफिलेक्सिस (अत्यंत तीव्र व जलद गतीने वाढणारी ॲलर्जीक प्रतिक्रिया ज्याने आपत्कालीन वैद्यकीय प्रसंग उद्भवतो) सारखी जीवघेणी स्थिती उद्भवू शकते. ॲलर्जीचे कारण हे असू शकते की अझोरुबिन खाद्य डाईच्या रेणूंना (molecules) आपली रोगप्रतिकारशक्ती चुकून व्हायरस किंवा बॅक्टेरिया समजते आणि त्यांच्याविरुद्ध हल्ला करण्याची प्रतिक्रिया सुरू करते, ज्यामुळे ॲलर्जी निर्माण करणारी आणि दाह किंवा सूज निर्माण करणारी रसायने, जसे की हिस्टामाइन, बाहेर पडतात.
B) पचनसंस्थेशी संबंधित (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) समस्या:
कारमोइसिन/अझोरुबिनच्या या कृत्रिम खाद्य रंगद्रव्याच्या सेवनामुळे पचनसंस्थेशी संबंधित (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) समस्या उद्भवू शकतात, जसे की पोट फुगणे, अवशोषणात अडथळा (Malabsorption) – अन्नातील काही पोषक घटक नीट शोषले न जाणे, मळमळ आणि अतिसार होऊ शकतात. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे ही असू शकतात, ज्यात पचनसंस्थेतील पेशींमध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण निर्माण होऊन DNA चे नुकसान होऊ शकते, सूक्ष्म आंतातील मायक्रोव्हिलींच्या रचना व कार्यात बिघाड होऊन पोषक द्रव्यांचे पचन व शोषण कमी होते आणि कारमोइसिनच्या विघटन उत्पादनांमुळे (उदा. विषारी ॲरोमॅटिक ॲमाइन्स) आतड्यांच्या मार्गाला होणारी जळजळ आणि सूज असू शकतात.
C) मुलांमधील वर्तणूक संबंधित समस्या:
काही संशोधनांनुसार, कारमोइसिन या कृत्रिम रंगद्रव्याच्या सेवनामुळे विशेषतः मुलांमध्ये एडीएचडी (ADHD - Attention Deficit Hyperactivity Disorder) सारख्या लक्षणांची (चिडचिडेपणा, लक्ष केंद्रित न होणे, अस्वस्थता) आणि वर्तणुकीच्या समस्यांची वाढ दिसून आली आहे. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात मेंदूमधील न्यूरोट्रान्समीटर्स (मेंदूमध्ये संदेशवहन करणाऱ्या रासायनिक घटकांमध्ये असंतुलन) यांच्यातील संतुलनात बिघाड, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे मेंदूच्या पेशींना होणारी हानी, आणि कारमोइसिनच्या पचन प्रक्रियेदरम्यान (metabolism) पचनसंस्थेच्या मार्गात मज्जासंस्थेला हानीकारक चयापचय पदार्थांचा (Neurotoxic metabolites म्हणजे असे रासायनिक उपउत्पाद (by-products) जे शरीरात एखाद्या पदार्थाच्या पचन (digestion) किंवा चयापचय (metabolism) प्रक्रियेत तयार होतात आणि जे मेंदू व मज्जासंस्थेला हानी पोहोचवू शकतात) स्राव होणे, इत्यादी असू शकतात.
D) कर्करोगाचा धोका:
या कृत्रिम खाद्य रंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने कर्करोग (malignancy) होण्याचा धोका वाढू शकतो. यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की Carmoisine चे चयापचय-उत्पाद (metabolic products) हे ज्ञात कॅन्सरकारक संयुगे (उदा. aromatic amines) असू शकतात. शरीरात निर्माण होणारी अत्यधिक जळजळ किंवा सूज. ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस मुळे DNA व पेशींना होणारे नुकसान.
E) यकृत आणि मूत्रपिंडांना हानी:
या खाद्य रंगाचे अत्याधिक आणि दीर्घकाळ सेवन केल्यास यकृत आणि मूत्रपिंड (kidneys) यांसारख्या आपल्या महत्त्वाच्या अवयवांना हानी पोहोचू शकते. यामागील कारणे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि फ्री रॅडिकल्समुळे यकृत आणि मूत्रपिंडाच्या पेशी आणि ऊतींना होणारी हानी, चरबी आणि इतर पोषक तत्वांचे चयापचय करण्याची यकृताची क्षमता बिघडणे, लहान आतड्यांमध्ये पित्त आम्लांचा (bile acids) स्राव रोखला गेल्यामुळे यकृतात साचून (Cholestasis) ज्यामुळे त्याच्या कार्यक्षमतेस हानी पोहोचू शकते.
F) महिलांच्या प्रजनन प्रणालीवर होणारे दुष्परिणाम:
काही वैज्ञानिक संशोधनांनुसार, कारमोइसिन कृत्रिम खाद्य रंग महिलांच्या प्रजनन प्रणालीमध्ये हार्मोनल असंतुलन निर्माण करू शकतो. यामुळे मासिक पाळी अनियमित होणे आणि वंध्यत्व येऊ शकते.
G) सुरक्षित सेवन मर्यादा किती आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, कारमोइसिन (अझोरुबिन) ला मर्यादित प्रमाणात (साधारणपणे १०० पीपीएम किंवा १०० मिलीग्राम/किलो) आणि उष्णतेने प्रक्रिया केलेल्या भाज्यांमध्ये २०० पीपीएम किंवा २०० मिलीग्राम/किलो पर्यंत कृत्रिम खाद्य रंग म्हणून वापरण्याची परवानगी आहे. कारमोइसिन/अझोरुबिनच्या स्वीकारार्ह दैनिक सेवनाची (Acceptable Daily Intake - ADI) कमाल मर्यादा ४ मिलीग्राम/किलो शरीराचे वजन/दिवस आहे.
ग्राहक सुरक्षेवर भर देत कर्नाटक सरकारने जून २०२४ पासून कारमोइसिन (Carmoisine) वापरण्यास बंदी घातली आहे.
4. पॉन्सो ४आर (PONCEAU 4R): (E-124)
हा एक कृत्रिम खाद्य रंग आहे, जो त्याच्या स्ट्रॉबेरी लाल रंगासाठी अन्न आणि पेय उद्योगांमध्ये सामान्यतः वापरला जातो. तो औषधनिर्मिती (Pharmaceutical) व सौंदर्यप्रसाधन (Cosmetic) उत्पादनांमध्ये देखील याचा वापर केला जातो. हे ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्सपासून बनवलेले एक कृत्रिम अझो डाई आहे आणि त्याला कोचीनिअल रेड ए (Cochineal Red A) किंवा ॲसिड रेड १८ (Acid Red 18) म्हणूनही ओळखले जाते. तो प्रकाश, उष्णता आणि आम्लांमध्ये स्थिर असतो, परंतु ॲस्कॉर्बिक ॲसिडच्या उपस्थितीत त्याचा रंग फिका होतो आणि त्याला E-124 या क्रमांकाने ओळखले जाते.
हे कुठे वापरले जाते?
हा रंग विविध खाद्यपदार्थांना स्ट्रॉबेरी लाल रंग देण्यासाठी वापरला जातो. याव्यतिरिक्त, तो औषधनिर्मिती आणि सौंदर्यप्रसाधनांमध्येही वापरला जातो.
A) खाद्यपदार्थ: (त्याच्या गडद आणि आकर्षक लाल/गुलाबी रंगासाठी)
B) औषधनिर्मितीत वापर: (सौंदर्यपूर्ण आकर्षण वाढवण्यासाठी आणि ओळख सुलभ करण्यास)
C) सौंदर्यप्रसाधने: (लाल, गुलाबी किंवा कोरल शेड्ससाठी)
संबंधित आरोग्य धोके:
A) ॲलर्जीक प्रतिक्रिया (वावडं):
संवेदनशील व्यक्तींमध्ये, पॉन्सो ४आर असलेले खाद्यपदार्थ, औषधे किंवा सौंदर्यप्रसाधने (त्वचेवर लावल्यास) यांचे सेवन/वापर केल्यास त्वचेवर पुरळ, अंगावर पित्त उठणे आणि एक्झिमापासून ते श्वास घेण्यास त्रास होणे आणि दम्यासारख्या लक्षणांपर्यंत ॲलर्जीक प्रतिक्रिया होऊ शकतात. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात हिस्टामाइनचा स्राव आणि अझो संयुगांप्रति (पॉन्सो ४आर हे अझो संयुग आहे) संवेदनशील असलेल्या लोकांमध्ये ॲलर्जीक प्रतिक्रिया (वावडं) निर्माण होणे असू शकते. या खाद्य डाईचा इतर ॲडिटिव्ह्ज आणि पदार्थांशी संबंध आल्यास ॲलर्जीक प्रतिक्रिया अधिक वाढू शकते.
B) ॲल्युमिनियमे विषबाधा:
पॉन्सो ४आर खाद्य रंगामध्ये ॲल्युमिनियमचे क्षार (salts) असतात; त्याचे अत्यधिक किंवा दीर्घकाळ सेवन केल्यास ॲल्युमिनियम विषबाधेचा (toxicity) धोका वाढू शकतो.
C) मुलांमध्ये वर्तणूकविषयक होणारे परिणाम:
इतर कृत्रिम खाद्य रंगांप्रमाणेच, पॉन्सो ४आर च्या अति सेवनामुळे मुलांमध्ये एडीएचडीसारखे वर्तणुकीतील बदल (लक्ष न लागणे, अतिसक्रियता / अतिचंचलता, चिडचिड, इत्यादी) दिसून येऊ शकतात. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे न्यूरोट्रान्समीटर्सच्या (डोपामाइन आणि नॉरएपिनेफ्रिन) निर्मिती आणि कार्यात होणारा बिघाड असू शकतो, जे लक्ष केंद्रित करणे आणि आवेग नियंत्रणासाठी (impulse control) महत्त्वाचे आहेत. यामुळे मेंदूची रचना आणि कार्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो, तसेच लोह आणि मॅग्नेशियमसारख्या आवश्यक पोषक घटकांच्या शोषणात अडथळा येऊ शकतो.
D) लाल रक्तपेशी व हिमोग्लोबिन पातळी कमी होणे:
काही वैज्ञानिक अभ्यासानुसार, पॉन्सो ४आर च्या अति सेवनामुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी आणि लाल रक्तपेशींच्या संख्येवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. यामागे अनेक संभाव्य जैविक प्रक्रिया कारणे असू शकतात, ज्यात रक्तपेशींवर थेट नकारात्मक परिणाम, गुणसूत्रांमध्ये (chromosomal) विकृती निर्माण होणे ज्यामुळे लाल रक्तपेशींच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो आणि यकृत व मूत्रपिंडाला (महत्त्वाचे अवयव) इजा झाल्यामुळे होणारे अप्रत्यक्ष परिणाम असू शकतात.
E) कर्करोगजनकता (Carcinogenicity):
पॉन्सो ४आर खाद्य रंगाच्या सेवनामुळे डीएनएला हानी होण्याचा आणि कर्करोग (malignancy) होण्याचा धोका वाढतो. डीएनएला हानी होण्यामागील कारणे पॉन्स्यू ४आर च्या चयापचयादरम्यान तयार होणाऱ्या ॲरोमॅटिक ॲमाइन्सचा हानिकारक प्रभाव, जास्त ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पिशीजचा (Reactive Oxygen Species) हानिकारक प्रभाव आणि पॉन्सो ४आर च्या सेवनामुळे शरीरात ॲल्युमिनियमचे प्रमाण वाढणे. इत्यादी असू शकतात.
सुरक्षित सेवन मर्यादा किती आहे?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, पॉन्सो ४आर ला कृत्रिम खाद्य रंग म्हणून मर्यादित प्रमाणात (साधारणपणे १०० पीपीएम किंवा १०० मिलीग्राम/किलो) वापरण्याची परवानगी आहे, जेव्हा तो एकटा किंवा इतर रंगांसोबत वापरला जातो. या कृत्रिम खाद्य रंगासाठी स्वीकारार्ह दैनिक सेवन (Acceptable daily intake - ADI) ०-४ मिलीग्राम/किलो शरीराचे वजन/दिवस आहे.
या लेखात, आपण विविध प्रकारच्या लाल कृत्रिम खाद्य रंगांचा सविस्तर माहिती पाहिली. या लेखाच्या पुढील भागात, आपण पिवळ्या कृत्रिम खाद्य रंगांबद्दल सविस्तर चर्चा करू.
REFERENCES:
https://pubchem.ncbi.nlm.nih.gov/compound/3259
https://www.healthline.com/nutrition/food-dyes#TOC_TITLE_HDR_4
https://pubchem.ncbi.nlm.nih.gov/compound/Allura-Red-AC
https://www.atamanchemicals.com/allura-red-ac_u26180/
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC11464682/
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10502305/
https://www.echemi.com/cms/982994.html
https://www.atamanchemicals.com/e-122-carmoisine_u33181/
https://www.researchgate.net/publication/256195960_Effects_of_Synthetic_Food_Color_Carmoisine_on_Expression_of_Some_Fuel_Metabolism_Genes_in_Liver_of_Male_Albino_Ratshttps://www.efsa.europa.eu/en/efsajournal/pub/1332
https://www.atamanchemicals.com/lake-ponceau-4r_u33158/
https://www.macsenlab.com/speciality-dyes-biological-stains/ponceau-4r-2611-82-7/
https://vpbim.com.ua/knowledgebase/effect-of-ponceau-4r-food-
dye-on-humans-and-animals-the-literature-review/
Disclaimer: This article is intended for general informational purposes only and provides an overview of artificial food colours and their presence in foods, cosmetics, and medicines. It should not be considered medical or professional advice. Always consult your doctor or qualified healthcare provider before making any decisions regarding your health, treatment, or medication. Do not stop, change, or skip any prescribed treatment without medical guidance.