Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

ह्या उन्हाळ्यामध्ये सूर्य पूर्ण ताकदीनिशी तळपत असतांना आणि दिवसागणिक तापमान वाढत असतानां, थंडाव्यासाठी शीतपेय हे आवश्यकच. ह्या करता तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. थंड काकडीचे सूप ज्याच्यामध्ये कुठल्याही शीतपेयाच्या पेक्षा किंवा फ्रुट ज्यूस (कृत्रिम किंवा फ्रेश) पेक्षा खूपच कमी कॅलरीज (कारण ह्यामध्ये फक्त काकडी आणि कांदा हे दोनच घटक आहेत आणि साखर नावालासुद्धा नाही) आहेत. तर मग ह्या उन्हाळ्यामध्ये कमी कॅलरीयुक्त आणि पौष्टिक अश्या थंडगार काकडीच्या सूपची मजा लुटुयात.

 

थंडगार काकडीचे सूप

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. काकडी - १ (साधारण आकाराची) २. कांदा - १ (छोट्या आकाराचा) ३. पुदिना - १०-१२ पाने ४. दही - ७५ मिली ५. आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट - १/४ टी स्पून ६. चाट मसाला - १/४ टी स्पून ७. मिक्स हर्ब्स पावडर - १/४ टी स्पून ८. मीठ - चवीप्रमाणे

 

पध्दत :

१. एक साधारण नेहमीच्या आकाराची काकडी घ्यावी आणि त्याची सालं काढून घ्यावीत. २. सालं काढून झाल्यावर ह्या काकडीचे बारीक तुकडे करून घ्यावेत. ३. आता एक छोटा कांदा घेऊन त्याचे चार तुकडे करावेत. ४. नंतर साहित्यामध्ये दिलेले सर्व पदार्थ (काकडीचे बारीक तुकडे, कापलेला कांदा, दही, चाट मसाला, आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट, पुदिन्याची पाने आणि चवीप्रमाणे मीठ) मिक्सर मध्ये घालून ते एकजीव करून घ्यावेत. ५. ह्यामध्ये नंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून ते सूप प्रमाणे पातळ बनवून घ्यावे. ६. हे झाल्यानंतर एका बाउल मध्ये किंवा ग्लास मध्ये हे भरून घ्यावे. ७. त्यामध्ये चवीसाठी थोडी मिक्स हर्ब्स पावडर घालावी आणि सजावट म्हणून एक पुदिन्याचे पान ठेवावे. ८. आता हे काकडीचे सूप थंड होण्यासाठी फ्रीझ मध्ये ठेवून द्यावे. ९. आता आवश्यकतेनुसार बर्फाचे खडे घालून ह्या थंडगार कमी कॅलरी युक्त काकडीच्या सूप चा आनंद लुटावा.

 

Recipe in English