Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

अशा एका धोक्याची कल्पना करा जो तुम्हाला दिसत नाही, ज्याची चव घेता येत नाही आणि ज्याचा वासही येत नाही — असा धोका म्हणजे ध्वनीप्रदूषण. दृष्टीस पडणारे इतर प्रदूषणाचे प्रकार याच्या तुलनेत जास्त लक्ष वेधून घेतात, पण ध्वनीप्रदूषण आपल्या आरोग्यासाठी आणि स्वास्थ्य - कल्याणासाठी एक मोठा धोका ठरतो. कोणताही असा ध्वनी जो नकोसा वाटतो, त्रासदायक असतो आणि जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यू.एच्‍.ओ.) निश्चित केलेल्या सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असतो, तो ध्वनीप्रदूषण मानला जातो.
   
ध्वनीची तीव्रता डेसिबल (dB) या एककात मोजली जाते. आपल्या आजूबाजूच्या वातावरणात अनेक प्रकारचे आवाज असतात — जसे की पानांची सळसळ (२० ते ३० डेसिबल) पासून ते विजेचा कडकडाट (१२० डेसिबल) आणि (१२० ते १४० डेसिबल) पर्यंतचा सायरनचा आवाज. ध्वनी (आवाज / कोलाहल) ७५  डेसिबल (dB) पेक्षा जास्त झाला की तो शरीरासाठी हानिकारक ठरतो, आणि १२० डेसिबलपेक्षा अधिक झाल्यास तो  वेदनादायक ठरतो.

WHO ने परिभाषित केल्यानुसार, ‘६५ डेसिबलपेक्षा (dB) अधिक आवाज हा ध्वनी प्रदूषण मानला जातो आणि जगभरातील एकतृतीयांशांहून अधिक लोक या व्यापक समस्येला सामोरे जात आहेत, ही गोष्ट चिंताजनक आहे.
 
दररोज लाखो लोक ध्वनिप्रदूषणाच्या परिणामांना सामोरे जात आहेत. मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्यामुळे होणारी सर्वात सामान्य आरोग्यविषयक समस्या म्हणजे – 'नोईज-इंड्यूस्ड हिअरिंग लॉस' (NIHL) म्हणजेच कमी ऐकू येणे. पण याचबरोबर ध्वनी प्रदूषणामुळे हृदयविकार, झोपेचा त्रास, मानसिक ताण, डोकेदुखी आणि स्मरणशक्ती क्षीण होण्यासारख्या आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. या आरोग्यविषयक समस्या आपल्या कार्यक्षमतेत आणि आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम करतात.

 

ध्वनीची तीव्रता/गंभीरता कशी वर्गीकृत केली जाते?
ध्वनीची तीव्रता डेसिबल (dB) या एककात मोजली जाते. ८५ डेसिबलपेक्षा अधिक तीव्रतेच्या आवाजाच्या सातत्यपूर्ण संपर्कामुळे श्रवण क्षतीचा धोका लक्षणीयरीत्या वाढतो.

डेसिबलच्या आधारे आवाजाची तीव्रता कशी वर्गीकृत केली जाते ते आता पाहूया: 

क्र. ध्वनीची प्रखरता / तीव्रता डेसिबल (dB) मर्यादा उदाहरणे
1 सौम्य ०-४० dB श्वासोच्छ्वास, कुजबुजणे , खोलीतील सरासरी आवाज
2 मध्यम ४०-६० dB सामान्य संभाषण, रिमझिम पावसाचा आवाज
3 तीव्र ६०-८५ dB कार्यालयातील आवाज, व्हॅक्यूम क्लिनर, लॉन (गवत) कापण्याचे यंत्र
4 अतितीव्र ८५-११० dB शहरी वाहतूक, रेल्वे/भुयारी रेल्वे, लीफ ब्लोअर
(पालापाचोळा झाडण्याचे यंत्र) 
5 वेदनादायक / धोकादायक ११०-१४० व त्याहून अधिक  विमान, रॉक कॉन्सर्ट्स, सायरन, बंदुकीचा  गोळीबार , फटाक्यांचा आवाज

 

 

ध्वनी प्रदूषण कुठून उत्पन्न होते?
'ध्वनी' हा माणसांच्या आणि निसर्गाच्या दैनंदिन क्रियाकलापांचा एक परिणाम (उपउत्पादन) आहे. यापैकी अनेक क्रिया आपल्या रोजच्या जीवनाचा भाग असल्या तरी, त्या क्रियांमधून निर्माण होणाऱ्या ध्वनीची पातळी जर सुरक्षित डेसिबल मर्यादेपेक्षा जास्त झाली, तर ती ध्वनीप्रदूषण ठरते.  त्याचे काही प्रमुख स्रोत दिले आहेत: 

वाहतूक (परिवहन):

  • रस्ते वाहतूक: कार, ट्रक, बस आणि मोटारसायकल यांसारख्या वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर  तीव्र ध्वनी (कोलाहल) निर्माण होतो. विशेषतः शहरांमध्ये, हा आवाज ध्वनीप्रदूषणाचे मुख्य कारण ठरु शकते.
  • हवाई वाहतूक: विमानांचे उड्डाण, विमान उतरताना आणि निवासी क्षेत्रांवरून कमी उंचीवर उडणारी विमाने तीव्र ध्वनी निर्माण करतात.
  • रेल्वे वाहतूक:  रेल्वे वाहतूक व्यवस्था, ज्यात प्रवासी आणि मालगाड्यांचा समावेश होतो, यांमुळे होणारा आवाज, विशेषतः रेल्वे मार्गांजवळील निवासी भागात, ध्वनीप्रदूषण निर्माण करु शकतो.
  • सागरी वाहतूक:: सागरी किनारपट्टीच्या भागांमध्ये जहाजे आणि फेरीसारखी जलपरिवहन साधने ध्वनिप्रदूषणात लक्षणीय भर घालू शकतात.

 

औद्योगिक उपक्रम :

  • उत्पादन: कारखाने, गिरण्या आणि अन्य औद्योगिक प्रकल्पांमध्ये वापरल्या जाणाऱ्या अवजड यंत्रसामग्री बहुतांश वेळा तीव्र ध्वनी निर्माण करतात, ज्यामुळे ध्वनीप्रदूषणाचा धोका वाढतो.
  • बांधकाम: खोदकाम, उत्खनन आणि इमारत पाडण्यासारख्या बांधकाम-संबंधित क्रिया, तसेच बांधकाम ठिकाणी वापरली जाणारी यंत्रसामग्री उच्च तीव्रतेचा ध्वनी निर्माण करतात, जो  ध्वनिप्रदूषणात लक्षणीय भर घालतो.
  • खाणकाम: स्फोटकांचे उपयोग, खोदकाम तसेच इतर खाणसंबंधित प्रक्रिया यांसाठी जड यंत्रसामग्रीची आवश्यकता असते, आणि अशा यंत्रांच्या वापरामुळे निर्माण होणारा तीव्र आवाज ध्वनिप्रदूषणात योगदान देतो.

 

मनोरंजनात्मक उपक्रम:

  • मोठ्या आवाजातील संगीत: संगीत मैफिली, क्लब्समधील ध्वनीप्रणाली, तसेच उच्च तीव्रतेवर वापरली जाणारी वैयक्तिक ऑडिओ उपकरणे अत्यधिक ध्वनी निर्माण करतात, ज्यामुळे श्रवणक्षमतेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते.
  • मैदानी कार्यक्रम: सण, क्रीडा स्पर्धा व अन्य मोठ्या प्रमाणावरील मैदानी सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान निर्माण होणारा उच्च तीव्रतेचा आवाज ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ घडवून आणतो.
  • ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर्स): सार्वजनिक उद्घोषणा देण्यासाठी अथवा करमणुकीसाठी मोठ्या आवाजात वापरण्यात येणारे लाऊडस्पीकर हे ध्वनिप्रदूषण निर्माण करणारे प्रमुख माध्यम ठरू शकतात.

 

इतर स्रोत:

  • घरगुती स्रोत : मिक्सर, ब्लेंडर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लिनर यांसारखी घरगुती उपकरणांमधूनही ध्वनिप्रदूषण निर्माण होऊ शकते.
  • नैसर्गिक स्रोत:: ज्वालामुखीचा उद्रेक, वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट, तसेच भूकंप यांसारख्या नैसर्गिक घटनांमध्येही तीव्र ध्वनी निर्माण होतो.
  • लॉनची निगा व देखभाल: शहरी भागात वापरल्या जाणाऱ्या लॉन मॉवर्स (गवत कापणारी यंत्र) आणि लीफ ब्लोअर्स (पालापाचोळा झाडण्याचे यंत्र) सारख्या लॉन देखभालीची साधने ध्वनी प्रदूषण निर्माण करू शकतात. 
  • इलेक्ट्रिकल जनरेटर: वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडिततेमुळे वापरण्यात येणारे जनरेटर विशेषतः खूप मोठा आवाज निर्माण करतात, जो ध्वनिप्रदूषणास कारणीभूत ठरतो.
  • पवनचक्की: आश्चर्याची गोष्ट म्हणजे, पवनचक्की, अक्षय ऊर्जा स्रोत असूनही, एका विशिष्ट अंतरापर्यंत तीव्र ध्वनी निर्माण करू शकतात.

 

या लेखामध्ये आपण ध्वनिप्रदूषण म्हणजे काय, त्याची प्रखरता किवा तीव्रता कशी मोजली जाते आणि त्याचे विविध स्रोत कोणते आहेत, हे पाहिले. पुढील भागामध्ये आपण ध्वनिप्रदूषणामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांचा आढावा घेऊ आणि त्याविरुद्ध प्रतिबंधात्मक व संरक्षणात्मक उपाययोजनांचा विचार करू.

 

REFERENCES:-

 


Reader's Comments


Submit Your Comments