Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

कमी कॅलरीजचा शेझवान सॉस

 

 

साहित्य

मुख्यसाहित्य: १. लाल मिरची (काश्मिरी) - ६/७ नग (ही कमी तिखट असते आणि मुख्यत्वे पदार्थाला लाल रंग येण्यासाठी वापरली जाते) २. लसूण - ०६ पाकळ्या ३. आले - साधारण १ इंच ४. हिरवी मिरची - १ नग ५. टोमॅटो - २ नग ६. कांदा - १ नग ७. तेल - १ थेंब ८. मीठ चवीनुसार

 

पध्दत :

१. प्रथम सर्व भाज्या (सालासकट) कोमट पाण्यात हळद व मीठ घालून १५–२० मिनिटं भिजवून  घ्याव्यात. त्यानंतर, १५–२० मिनिटांनी सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. २. आले, लसणाच्या ३ पाकळ्या व हिरवी मिरची बारीक चिरुन घ्यावी. ३. एका पातेल्यात कोमट पाणी घ्यावे व त्यात लाल काश्मिरी मिर्च्या व लसणाच्या उरलेल्या ३ पाकळ्या १५–२० मिनिटे भिजवाव्यात. ४. हे मिश्रण टोमॅटो व कांद्यांसोबत मिक्सरमधून एकजीव पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यावे. (ही पेस्ट ’टोमॅटो प्युरी’ सारखी झाली पाहिजे). ५. एक कढई (सॉस पॅन) हॉटप्लेट / गॅस / स्टोव्हवर वर ठेवून गरम करुन घ्यावी व कढईस आतून एक थेंब तेल नीट लावून घ्यावे. ६. ह्यात आले, लसूण व हिरवी मिरची घालावी. ७. आता वास सुटेपर्यंत व सर्व बदामी रंगावर नीट परतून घ्यावे. ८. मग त्यात आपण अगोदर तयार केलेली प्युरी घालावी. ९. आता ह्यात आवश्यकतेनुसार व चवीनुसार मीठ घालावे. १०. आता त्यावर झाकण ठेवून ८–१० मिनिटे शिजू द्यावे. ११. हे मिश्रण जरा जाडसर होऊ द्यावे. १२. आता गॅस बंद करावा व सर्व पूर्णपणे थंड होऊ द्यावे. १३. आता आपला लो-कॅलरी शेझवान सॉस तयार झाला आहे. आपण आपल्या आवडत्या पदार्थांसह जसे की, सँडविच, फ्रँकी, नूडल्स, फ्राइड राइस, बर्गर इत्यादीं सोबत ह्याचा आस्वाद घेऊ शकता. 

या कमी मसालेदार पण तितक्याच आरोग्यदायी व चविष्ट... शेझवान सॉसचा आनंद घ्या, आणि ते ही कोणत्याही अपराधीपणाच्या भावने शिवाय.

English