Healthonic Healthcare - Aarogyam Sukhsampada
Aarogyam Sukhsampada - Health is the divine wealth.

 

व्हेजिटेबल स्प्रिंग रोल हा एक प्रसिद्ध चायनीज खाद्य पदार्थ आहे. आपणासर्वांना तो नक्कीचआवडतो, पण जेव्हा आपण हे पदार्थ खातो तेव्हा काही आरोग्यास घातक अशी रसायने उदा:  मोनोसोडियमग्लुटामेट, फयटोइस्ट्रोजन्स (प्रामुख्याने ह्या मध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉसेस मध्ये असतात) ह्या पदार्थांसोबत आपल्या शरीरा मध्ये जाण्याचा धोका असतो. ह्याचा आपल्या शरीरावर नक्कीच विपरीत परिणाम होऊ शकतो. त्याबोरबरच हे पदार्थ तळलेले असल्यामुळे ह्यात कॅलरीज पण खूपच जास्त असतात. अश्या परिस्थितीत कमी कॅलरी युक्त व्हेजिटेबल स्प्रिंगरोल हा उत्तम पर्याय ठरू शकतो. हे स्प्रिंगरोल्स तळलेले नाहीत आणि ह्यामध्ये कुठलेही हानिकारक सॉसेस पण वापरलेले नाहीत पण तरी सुद्धा हे अतिशय चविष्ट आहेत. पुढे दिलेली रेसिपी तुम्हाला हे कमी कॅलरीयुक्त स्प्रिंगरोल्स घरच्याघरी कसे बनवावेत ह्याबाबतीत मार्गदर्शन करेल.

 

 कमी कॅलरी युक्त व्हेजिटेबल स्प्रिंग रोल्स 

 

साहित्य

मुख्यसाहित्य (८-१०स्प्रिंगरोल्सबनवण्यासाठी): १. गाजर - १ (मध्यम आकाराचे) २. कांदा- २ (मध्यमआकाराचे) ३. लालभोपळा - १०० ग्रॅम  ४. कोबी - १०० ग्रॅम ५. भोपळीमिरची- २ (मध्यमआकाराची)  ६. पातीचाकांदा- १ जूडी ७. घरी बनवलेला टोमॅटो सॉस- १ मोठा बाउल (साधारण२५०ग्रॅम) ८. हिरवे वाटण/पेस्ट (कोथिंबीर, हिरवीमिरची, आलं, लसूण)- २ टेबलस्पून ९. संडे मसाला- १/२ टीस्पून. १०. चिली फ्लेक्स- १/२ टीस्पून. ११. ओरिगानो/ मिक्स हर्ब्स - १ टीस्पून १२. डेक्सट्रोस- १ टेबलस्पून (हवे असल्यास) १३. मीठ- चवी प्रमाणे (साधारण १-२ टीस्पून) १४. चाट मसाला- १ टीस्पून १५. तेल- ब्रशिंगसाठी १६. राईस पेपर- ८ किंवा पातळ ज्वारीच्या भाकऱ्या - ८ १७. कोमट पाणी- १ छोटा ग्लास भरून १८. ज्वारी- तांदूळ पेस्ट- ज्वारीच्या भाकरीच्या कडा चिकटवण्यासाठी

 

 

कृति :

१. प्रथम साहित्या मध्ये दिलेल्या सर्व भाज्या नीट धुवून घ्याव्यात. २. त्यानंतर गाजर आणि लाल भोपळ्याची सालं काढून घ्यावीत. ३. आता कांद्याची पात सोडून इतर सर्वभाज्या (गाजर, कोबी, लालाभोपळा, भोपळीमिरची आणि कांदा) लांब तुकड्यां मध्ये चिरून घ्याव्यात (जुलिएन स्ट्रिप्स). ४. कांद्याची पात बारीक तुकड्यां मध्ये कापून घ्यावी. ५. कापलेल्या सर्व भाज्या मीट आणि हळद मिश्रित कोमट पाण्यामध्ये भिजवत ठेवाव्यात (२० मिनिटां साठी). ६. २० मिनिटांनंतर सर्व पाणी काढून टाकावे आणि भाज्या स्वच्छ पाण्याने नीट धुवून घ्याव्यात. ७. आता कांदा आणि कांद्याची पात सोडून इतर सर्व भाज्या एका कढई मध्ये ५-८ मिनिटांसाठी नीट वाफवून घ्याव्यात (ह्या करता सोयीनुसार आणि उपलबद्धते नुसार हॉट प्लेट/ गॅस शेगडी /स्टोव्हचा वापर करू शकतो). ८. आता हॉट प्लेट/ गॅस शेगडी /स्टोव्हवर एक तवा गरम करत ठेवा आणि त्याला ब्रशने १ थेंब तेल सर्वबाजूने नीट लावून घ्या. ९. आता तव्यावर हिरवे वाटण/पेस्ट (कोथिंबीर, हिरवीमिरची, आलं, लसूण) घाला आणि १ मिनिटासाठी नीट परतून घ्या. १०. नंतर चिरलेल्या सर्वभाज्या ह्या मध्ये मिक्स करा. ११. त्यात घरी बनवलेला टोमॅटोसॉस सुद्धा मिक्स करा आणि मग ४-५ मिनिटांसाठी हे मिश्रण नीट ढवळून घ्या. १२. आता साहित्या मध्ये दिलेले सर्व मसाले (संडेमसाला, चाटमसाला, चिलीफ्लेक्स, ओरेगॅनो, इ.) ह्या मध्ये घालून नीट मिक्स करून घ्यावेत. १३. ह्या मध्ये डेक्सट्रोस घालणे बंधनकारक नाही. हवे असल्यास घालू शकतो. १४. आता चवी प्रमाणे मीठ मिक्स करावे. १५. नंतर हे मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे. १६. तव्यावर झाकण ठेवून द्यावे आणि हे सर्व मिश्रण ५ मिनिटांसाठी नीट शिजू द्यावे. १७. ५ मिनीटा नंतर गॅस/ स्टोव्ह/ हॉटप्लेट बंद करावा आणि मिश्रण थंड होऊ द्यावे. १८. आता कोमट पाण्यामध्ये राईस पेपर १५-२० सेकंदां साठी बुडवून ओला करून घ्यावा. १९. तो नीट ओला झाला कि त्यावर १ टेबलस्पून वर बनवलेले मिश्रण ठेवावे आणि राईसपेपर स्प्रिंग रोल साठी गुंडाळतात तसा रोल करून घ्यावा. २०. तो रोल केल्यावर त्याच्या दोन्ही कडानीट चिकटलेल्या आहेत ना ह्याची खात्री करून घ्यावी. २१. आता कच्चे स्प्रिंगरोल तयार झाले. हे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा, ते भाजू शकता जसे,

पद्धत १:

१. एक तवा हॉट प्लेट/गॅस शेगडी/स्टोव्ह वर गरम करत ठेवावा आणि त्याला ब्रशने २-३ थेंब तेल लावून घ्यावे. २. हे कच्चे स्प्रिंग रोल्स त्यावर ठेवावेत आणि नीट खरपूस होईपर्यंत भाजून घ्यावेत.

पद्धत २: १. हे स्प्रिंगरोल्स एअर-फ्रायर मध्ये १८० अंशतापमानावर १७ मिनिटांसाठी भाजावेत (असे केल्यास ते आधिक कुरकुरीत लागतात).

हे स्प्रिंगरोल्स बनवल्यानंतर लवकरात लवकर चटणी किंवा खट्टा मीठा सॉस सोबत खावेत अन्यथा ते मऊ पडण्याची शक्यता असते.

 

सूचना:

राईस पेपर उपलब्ध नसल्यास पातळ ज्वारीचीभाकरी कव्हर म्हणून वापरू शकतो. हि भाकरी कोमट पाण्या मध्ये बुडवू नये. ह्याच्या कडा चिकटवण्यासाठी ज्वारी-तांदूळ पेस्ट चा वापर करावा. बाकी सर्वकृती वर दिल्या प्रमाणे करावी.

 

 

Recipe in English